
सध्या हृदयविकाराचा आजार वेगाने बळावत चालला आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांपासून ते वयाची साठी-सत्तरी ओलांडलेले नागरिक ह्दयविकाराला बळी पडत आहेत. ह्दयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. अचानक निरोगी माणसाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण वाचत आहोत. मैदानावर खेळताना किंवा जीममध्ये घाम गाळताना ह्दयविकाराच्या झटका आला आणि दगावला असे प्रकार अलीकडच्या काही वर्षात वाढले आहेत. आता अशीच एक दु:खद घटना नाशिकमधून समोर आली आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत ही दुर्देवी घटना घडली. श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना तिला चक्कर आली.
खाजगी रुग्णालयात दाखल केलं
शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच तिला खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून श्रेयाला मृत घोषित केलं. या मुलीला हृदयाशी संबंधित आजार असल्याने तिला हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता आहे.
छातीत दुखणे म्हणजे हार्ट अटॅक नाही
छातीत दुखणे सुरू झाल्यावर लोकांना अनेकदा हार्ट अटॅकची भीती वाटते, पण दरवेळी छातीत दुखणे हे हार्ट अटॅक असते असे नाही. पोटात किंवा आतड्यांमध्ये अडकलेला गॅस देखील छातीत तीव्र, पेटके येण्यासारखा किंवा जळजळणारा दुखणे निर्माण करू शकतो, जे कधीकधी हार्ट अटॅकसारखे वाटते. हे दुखणे बऱ्याचदा घाईघाईने खाणे, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणे आणि कार्बोनेटेड पेय पिण्यामुळे होते.
कुठले पदार्थ हार्ट अटॅकला ठरतात कारणीभूत
चीझ, बर्गर, टिक्की-समोसा, नान, मैदा आदी पदार्थांपासून कायम दूर राहा. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात हानिकारक चरबी असते, जी शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते. नंतर ही चरबी नसांमध्ये साठून हार्ट अटॅक येण्याचे मुख्य कारण ठरते. याच कारणामुळे आजकाल हार्ट अटॅकमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे.
हार्ट अटॅक कधीही अचानक येत नाही
हार्ट अटॅक कसा येतो? तो अचानक येतो की मृत्यू येण्यापूर्वी काही संकेत देतो? हार्ट अटॅक कधीही अचानक येत नाही, तो येण्यापूर्वी अनेक महिने आधीच संकेत देण्यास सुरुवात करतो. पण बहुतेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना याबाबत माहिती नसते.