Nashik Corona | कोरोनाची साडेसाती संपली, 2 वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्णसंख्या शून्यावर

| Updated on: Mar 22, 2022 | 9:36 AM

नाशिक जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे मृत्यू अचानक वाढले होते. 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे तब्बल 33 बळी गेल्याचे समोर आले. त्यामुळे आरोग्य विभागही हादरून गेला होता. मात्र, आता हे मृत्यूसत्र आणि कोरोना रुग्णवाढीलाही पूर्णविराम मिळालाय.

Nashik Corona | कोरोनाची साडेसाती संपली, 2 वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्णसंख्या शून्यावर
CORONA TESTING
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरोनाची (Corona) साडेसाती तूर्तास तरी संपली आहे. कारण पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्णसंख्या चक्क शून्यावर आली आहे. एकीकडे चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, भारतात दिलासा मिळताना दिसून येतोय. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सोमवार, 21 मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्हात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5 आहे, तर पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ शून्य नोंदवली गेलीय. नाशिक महापालिका (Municipal Corporation), नाशिक ग्रामीण, मालेगाव महापालिका आणि जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तींपैकी एकही जण कोरोनाबाधित आढळला नाही. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे काल या सर्व ठिकाणी कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. सध्या नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या ही 8899 वर स्थिर आहे. आता हा आकडा इथेच थांबावा, त्यात कसलिही वाढ होऊ नये, अशीच आशा प्रत्येक नाशिककर व्यक्त करतोय.

निर्बंध हटवले गेले

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. मृत्यू थांबले. त्यातही शहरी भागातील लसीकरणाचे प्रमाण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे ध्यानात घेता महापालिकेच्या विनंतीवरून कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालाय. सारे कार्यक्रम, चित्रपटगृहे, नाटक आदी ठिकाणी आता शंभर टक्के उपस्थिती शक्य झाली आहे. हे सारे पाहता पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना शासनामार्फत 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातून 15 हजार 233 अर्ज आले आहेत. त्यापैकी 9 हजार 664 अर्जांना मंजुरी मिळालीय, तर 4 हजार 486 प्रस्तावांची तपासणी सुरू असून 1 हजार 83 प्रस्ताव नामंजूर केले आहेत.

फेब्रुवारीत अचानक वाढले मृत्यू

नाशिक जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे मृत्यू अचानक वाढले होते. या काळात जिल्ह्यात रोज एका तरी कोरोना रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे तब्बल 33 बळी गेल्याचे समोर आले. यातले 18 बळी हे नाशिक महापालिका क्षेत्रात गेले, तर 16 बळी हे नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्याचे समोर आले. त्यामुळे आरोग्य विभागही हादरून गेला होता. मात्र, आता हे मृत्यूसत्र आणि कोरोना रुग्णवाढीलाही पूर्णविराम मिळालाय.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!