श्रीसदस्यांचा शवविच्छेदन अहवाल आला, 14 पैकी 12 सदस्यांनी 7 तास… अहवालातील धक्कादायक माहिती काय?

| Updated on: Apr 20, 2023 | 1:59 PM

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात दगावलेल्या 14 श्रीसदस्यांचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

श्रीसदस्यांचा शवविच्छेदन अहवाल आला, 14 पैकी 12 सदस्यांनी 7 तास... अहवालातील धक्कादायक माहिती काय?
Maharashtra Bhushan Award
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईच्या खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचा तडाखा बसल्याने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे अनेकजण अत्यवस्थ झाले. त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर श्रीसदस्य दगावल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मृत श्रीसदस्यांचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. त्यात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. 14 पैकी 12 सदस्यांनी सात तास काहीच खाल्ले नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी हा सोहळा पार पडला. त्या दिवशी 42 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. या रणरणत्या उन्हात लाखो श्रीसदस्य बसले होते. तब्बल तीन ते चार तास रणरणत्या उन्हात बसल्यामुळे 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहे. या मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. अहवालानुसार 12 जणांनी सात तास काहीच खाल्ले नव्हते. उपाशीतापाशीच ते रणरणत्या उन्हात बसून होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

आधीपासूनच आजारी

उरलेल्या दोन लोकांनी काही खाल्ले होते का नाही याची माहिती अजून आलेली नाही. मृत्यू झालेल्यांना आधीपासूनच कोणता ना कोणता आजार असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. आधीपासूनच आजारी. त्यात सात तास उपाशी आणि रणरणतं ऊन यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं.

सावलीची गरज होती

रविवारी ऊन जास्त होतं. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या लोकांच्या शरीरातील पाणी कमी झालं. त्याचा रक्तातील प्रोटीन्सवर परिणाम झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि 14 लोकांचा मृत्यू झाला. जर या लोकांना पाणी प्यायला मिळालं असतं तरी काहीच फरक पडला नसता. त्या लोकांना पाण्यापेक्षा सावलीची गरज अधिक होती, असं एका डॉक्टरने म्हटलं आहे.

अधिकाऱ्याचीही तब्येत बिघडली

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी कार्यक्रमाच्या एक दिवस आधी जिल्हा प्रशासनाचा अधिकारी घटनास्थळी दाखल झाला होता. मात्र, प्रचंड उन्हामुळे त्यांची ही तब्येत बिघडली होती. परंतु त्या अधिकाऱ्याने हे वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं नाही. त्या अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं असतं किंवा उन्हामुळे गडबड होऊ शकते असं सांगितलं असतं तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती असं सांगितलं जात आहे.