‘गोकुळ’च्या वादात नवनाथ बन यांची उडी; म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर मोर्चा काढा, कारणही सांगितलं
'गोकुळ'च्या वादात नवनाथ बन यांनी उडी घेतली आहे. बन यांनी थेट संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

‘गोकुळ’मध्ये शासन नियुक्त संचालकावरून ट्विस्ट निर्माण झाला आहे. शासननियुक्त संचालकामुळे गोकुळवरील सत्ता निसटण्याची भीती सतेज पाटलांना वाटू लागली आहे. त्यामुळे गोकुळचा वाद कोर्टात पोहोचला आहे. तर या वादावरून वर्षा बंगला किंवा मंत्रालयावर मोर्चा काढला पाहिजे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. संजय राऊतांवर भाजप नेते नवनाथ बन यांनी हल्लाबोल केला आहे. वर्षा बंगला ऐवजी संजय राऊत यांनी मातोश्रीवर मोर्चा काढला पाहिजे, अशी टीका नवनाथ बन यांनी केली.
नवनाथ बन यांनी व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांवर टीका केली. नवनाथ बन म्हणाले, संजय राऊत म्हणतात, वर्षावर मोर्चा काढला पाहिजे, परंतु मोर्चा काढायचा असेल. तर त्या मोर्चाची सुरुवात मातोश्रीपासून सुरुवात केली पाहिजे. लोकशाहीची हत्या 2019 साली ही उद्धव ठाकरेंनी केली होती. लोकशाहीची गळा घोटण्याची परंपरा 2019 साली सुरू केली. बहुमत भाजप महायुतीला असताना, तुम्ही ते नाकारून काँग्रेससोबत बसलात. त्यामुळे मोर्चा वर्षावर काढण्याऐवजी मातोश्रीवर काढला पाहिजे. गोकुळमध्ये लोकशाहीच्या मार्गाने सत्ता स्थापन होणार आहे. लोकशाहीच्या मार्गाने सरकार येणार आहे. गोकुळमध्ये लोकशाहीचा सन्मान होईल. गोकुळमध्ये लोकशाहीच्या मार्गाने सदस्य निवडून आले. त्यांची सत्ता येईल, संजय राऊत यांनी चिंता करू नये. लोकशाही आणि लोकशाहीचा मंत्र वाचवण्यासाठी संजय राऊतांना मोर्चा काढायचा असेल, तर मातोश्रीवर काढावा. लोकशाहीचा गळा घोटण्याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली होती’.
संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊतांनी देखील गोकुळच्या वादावरून भाजप, महायुतीवर टीका केली. त्यांनी या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. राऊत म्हणाले, ‘गोकुळ संदर्भात मोर्चा फक्त कोल्हापुरात निघायला नको. तर तो मोर्चा वर्षा बंगल्यावर निघाला पाहिजे. गोकुळ संदर्भातील मोर्चा हा राज भवनावर निघाला पाहिजे. तसेच हा गोकुळ संदर्भातील मोर्चा महाराष्ट्रातील मंत्रालयावर निघाला पाहिजे. लोकांनी दिलेला कौल, हा कसा नाकारला जातो. पराभुतांच्या हातात पुन्हा सत्ता दिली जाते. हे फक्त आपल्या देशातच घडू शकते. कोल्हापुरातील निर्णय लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे’.
