नक्षलविरोधी कारवाईला मोठं यश, जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला बेड्या

62 वर्षीय नर्मदाक्का नक्षलवादी चळवळीच्या सेंट्रर कमिटीची सदस्य आहे. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या जवळपास 27 वर्षांपासून नर्मदाक्का नक्षलवादी चळवळीत सक्रीयपणे काम करते आहे.

  • गजानन उमाटे, मोहम्मद इरफान, टीव्ही 9 मराठी
  • Published On - 7:46 AM, 12 Jun 2019

गडचिरोली : जहाल नक्षलवादी नर्मदाक्का आणि किरण कुमार इलियास या दाम्पत्याला तेलंगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे. नर्मदाक्का ही नक्षलवादी चळवळीच्या सेंट्रल कमिटीची सदस्या आहे.

गेल्या 27 वर्षांपासून नर्मदाक्का नक्षलवादी चळवळीत सक्रीय आहे. नर्मदाक्का आणि तिचा पती किरण कुमार इलियास यांच्यावर प्रत्येकी 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

नर्मदाक्काची अटक म्हणजे नक्षलवादीविरोधी कारवाईत पोलिसांना आलेलं सर्वात मोठं यश मानलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नक्षलवाद्यांकडून मोठमोठे जीवघेणे हल्ले, हत्या केल्या जात असताना, या नक्षलवाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि प्रसंगी नक्षलवाद्यांच्या क्रूर कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या नर्मदाक्काला पोलिसांनी अटक केल्याने, नक्षलवादीविरोधी कारवाईला गती मिळेल, तसेच आगामी घटना रोखण्यासही महत्त्वाची माहिती नर्मदाक्काकडून मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहे नर्मदाक्का?

62 वर्षीय नर्मदाक्का नक्षलवादी चळवळीच्या सेंट्रर कमिटीची सदस्य आहे. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या जवळपास 27 वर्षांपासून नर्मदाक्का नक्षलवादी चळवळीत सक्रीयपणे काम करते आहे. तसेच, नर्मदाक्का क्रांतिकारी महिला आदिवासी संघटनेची अध्यक्षा आहे.

नर्मदाक्का मूळची आंध्रप्रदेशच्या गुंडुर जिल्ह्यातील गुरवाडा गावाची रहिवासी असून, तिचे शिक्षणही आंध्र प्रदेशमध्येच झालं.

तेलंगणातील (आधीच्या आंध्र प्रदेशात) सात पोलिस ठाण्यावर हल्ले करणारी महिला नक्षलवादी म्हणूनही नर्मदाक्का मध्यंतरी चर्चेत आली होती. नर्मदाक्का वेगवेगळी वेशभूषा परिधान करुन माहिती गोळा करत असे आणि त्यानंतर नक्षली पथकाला सोबत घेऊन हल्ला करत असे. नर्मदाक्काच्या कार्यकाळात नक्षलवादी मोठया प्रमाणात पोलिसांचे बंदुका, रायफल चोरुन नेण्यात यशस्वी झाले.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड यांसह महाराष्ट्रातील गडचिरोली अशा अनेक ठिकाणी अनेक गुन्हे नर्मदाक्कावर दाखल आहेत.

दरम्यान, तेलंगणातील ग्रेहाऊंड पोलिसांकडून सध्या नर्मदाक्काची चौकशी सुरु आहे. गडचिरोली पोलिसांचं नक्षलवादीविरोधी पथकही तेलंगणात दाखल झालं आहे.