
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत यावेळी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण यावेळी मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटानं ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती या निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आल्यानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटापुढे मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल आता काय लागणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान ही निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या नावाला विरोध करण्यात आला होता. जर मलिक असतील तर युती होणार नाही असं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं, त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये नवाब मलिक यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले मलिक?
नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही जण माझ्या नावाने बोंबाबोम करत होते. मी असेल तर युती होणार नाही, असं काही जणांनी म्हटलं होतं. पण अजित पवार हे माझ्या पाठीशी उभे राहिले. अजित पवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय योग्य आहे, असं यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.