
महाराष्ट्राचे रुबाबदार नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी साडे आठच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले आहे. विमान बारामतीत लँडिंगदरम्यान भीषण अपघातात कोसळले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामती दौऱ्यावर जात होते. मुंबईहून सकाळी निघालेले हे चार्टर विमान बारामती विमानतळाआधीच एका शेतात क्रॅश झाले. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. पवार कुटुंबियांना आणि बारामतीकरांना पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले आहेत.
युगेंद्र पवारांना अश्रू अनावर
मृतांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा अधिकारी, दोन पायलट आणि इतर सहकारी यांचा समावेश आहे. मृतकांची यादी नुकताच अधिकृतपणे जाहीर झाली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामतीत शोकाची लाटा पसरली असून लोक भावुक झाले आहेत. या बातमीने अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना धक्का बसला आहे. युगेंद्र पवार यांना अचानक फोन आला, ते ऐकून युगेंद्र पवार यांच्या डोळ्यात अश्रू दिसले. हॉस्पिटलमध्ये फोनवर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले असून, ‘दादा गेले’ असे म्हणत ते भावुक झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुप्रिया सुळेंची पोस्ट
सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी या दिल्लीत होत्या. त्या सकाळीच ही वार्ता कळताच बारामतीसाठी निघाल्या. दरम्यान सुप्रिया सुळे यांना लाडका दादा गेल्याने शोक अनावर झाला. त्यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सवर उद्धवस्त असे म्हटले आहे. एकाच शब्दात त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांनाही हा मोठा धक्का आहे. पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या डोळ्यात पाणी होते. ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेच. हसन मुश्रीफ यांनीही अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी ‘ज्याच्या जीवावर आम्ही राजकारण केलं, तेच दादा आम्हाला सोडून गेले’ अशा शब्दांत दु:ख व्यक्त केले. या अपघातानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
आज सकाळी नियोजीत सभेसाठी अजितदादा हे बारामतीसाठी निघाले. बारामती विमानतळावर विमान लॅडिंग करण्यापूर्वीच ते हेलकावे खात खाली कोसळले. शेजारील शेतात विमान कोसळले. सकाळी 8:30 वाजेच्या आसपास विमान कोसळल्याचे समजते. त्यावेळी आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांनी धाव घेतली.