महायुतीत मोठी धुसफूस, अजून भाव फुटलेले नाहीत..काय म्हणाले एकनाथ खडसे ?
एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की महायुतीतील शिंदे सेनेतील हा वाद आणखीनच वाढू शकतो. आगामी काळात यात अस्वस्थेत वाढ होऊ शकते असाही दावा त्यांनी केला.

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांपैकी सहा जागांवर बिनविरोध निवडणूका झाल्या असल्यात तरी या निवडणूकीत पैशाचा मोठा बाजार झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.११ जागांवर देखील महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेत मोठी धूसफूस असल्याचा आरोप केला आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांची निवडणूक लागल्याने राज्यात पुन्हा राजकारण तापले आहे. त्यातच बंडखोरांमुळे या निवडणूकीत पैशांचा मोठा व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाचे जळगावचे उमेदवार नंदू महाजन हे निवडून येतील, त्यांची बाजू मजबूत असल्याचे म्हटले आहे. तसेच विधान परिषद निवडणूक हा बाजार आहे, सध्या खरेदी विक्री सुरू आहे. अजून भाव फुटलेले नाहीत. निवडणुकीत जो जास्त पैसे देईल त्याला जास्त मतदान केले जाईल अशी स्थिती आहे असेही आरोप खडसे यांनी केला आहे.
गिरीश महाजन हे संकटमोचक म्हटले जातात. मात्र, नाशिक,जळगावमध्ये विधान परिषदेच्या निवडणूकीत मोठी बंडखोरी झाली. गिरीश महाजन यांना आपल्या प्रभाव क्षेत्रात बंडखोरी रोखता आली नाही. बंडखोरांची समजूत काढता आली नाही अशीही टीका खडसे यांनी केली आहे. महायुतीत सध्या कुरघोडी सुरू आहेत. गुलाबराव पाटील यांना जळगावची जागा त्यांच्या मुलासाठी हवी होती. ते आग्रही होते, मात्र त्यांना जागा न देता ही जागा नंदू महाजन यांना भाजपाने दिली. त्यामुळे गुलाबराव पाटील आणि शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किशोर पाटील म्हणतात बंडखोरीचा पहिला फटका हा मला बसला यावरून बंडखोरी आणि महायुतीत कुरघोडी सुरू असल्याने दिसते. रेशमा काळे यांनी अजून उमेदवारी मागे घेतलेली नाही, त्यामुळे त्या उमेदवारी मागे घेतात का? त्याची उत्सुकता कायम असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.