Gokul President Election : गोकुळचा नवा अध्यक्ष निवडण्याबाबत निवडणुकीआधी हसन मुश्रीफ यांचं सूचक विधान
Gokul President Election : गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सतेज पाटील आणि महायुतीच्या पॅनलमध्ये फक्त एका जागेचं अंतर आहे. सतेज पाटील यांच्या पॅनलकडे 13 तर महायुतीच्या पॅनलचे 12 उमेदवार निवडून आलेत.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणूक निकालावरुन महायुतीमध्ये आपसात सामना रंगला आहे. भाजप आणि शिवसेनेत परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. हा वाद सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा विषय काढला आहे. त्यांनी गोकुळ मधील पराभवाचं खापर भाजपवर फोडलं आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपसोबत वाद असल्यामुळे पराभव झाला असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. “भाजपसोबतचा वाद मिटला नाही, त्यामुळे 13 आणि 12 असा निकाल लागला. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड होणार नाही. सतेज पाटील यांच्याकडे 13 हा आकडा असला, तरी 14 हा आकडा होणार नाही” असं हसन मुश्रीफ म्हणाले.
“बंटी पाटील यांना एवढे मोठे बहुमत मिळाले असेल, तर त्यांनी अध्यक्ष निवडून दाखवावा. आम्ही सहकार्य करणार नाही, त्यामुळे आज ही निवडणूक होणार नाही. या निवडणुकीत दुःख एवढेच आहे की, माझ्या मुलाचा पराभव झाला. माझी चूक झाली होती की, जनरल प्रवर्गातून निवडणूक लढवायला हवी होती; मात्र आरक्षित जागेवरून निवडणूक लढवली” असं हसन मुश्रीफ म्हणाले.
मग विजय कोणाचा आहे?
“माझ्या मुलाला या निवडणुकीत टार्गेट करण्यात आले. सतेज पाटील यांनी जातीयवादी प्रचार केला होता, हा माझा आरोप आहे. मतांची सरासरी पाहिली, तर सतेज पाटील यांच्या पॅनलपेक्षा आम्हाला अधिक मते मिळाली आहेत. मग विजय कोणाचा आहे?” असं हसन मुश्रीफ यांनी विचारलं. “विजय आमच्या बाजूने होता, मात्र 13 उमेदवार तांत्रिकदृष्ट्या निवडून आले आहेत. आज अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत पाटील आहेत. बंटी पाटील त्यांना अध्यक्ष करणार होते. शशिकांत पाटील यांना भविष्यात अध्यक्ष बनवण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागणार” असं सूचक विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.
कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या 350 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी रजा न घेता निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याने प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे.
