
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करून त्यांची रेकी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. गेल्या चार दिवसांपासून 2 व्यक्ती झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत त्यांची रेकी करत होते, अशी तक्रार खुद्द झिशान सिद्दीकी यांनी केली होती. यानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यानतंर त्यांना सोडून देण्यात आले. आता या संपूर्ण प्रकरणावर झिशाण सिद्दीकींनी प्रतिक्रिया दिली आहे.
झिशान सिद्दीकी यांनी आपला पाठलाग होत असल्याचा आणि कुटुंबियांना लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही लोक रात्री माझ्या कार्यालयाजवळ फिरत होते. हेच लोक माझ्या मागे लागण्यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरीही गेले होते. तिथे त्यांना झिशान सिद्दीकी हा सलमान खानचा जवळचा मित्र आहे, त्याला भेटा असे कुणीतरी सांगितले होते. यानंतर हे संशयित लोक माझ्याबद्दल माहिती विचारत होते. मी एकटा कधी असतो, घरी कधी जातो, याबद्दलची चौकशी करत होते”, असे झिशान सिद्दीकी म्हणाले.
“माझ्यासोबत घडलेल्या घटनांनंतर मी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. या घटनेसोबतच, दोन दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचा मोबाईल नंबर हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला. यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी माझ्या आईचे आधार कार्ड वापरून हा मोबाईल नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. मला यापूर्वीही धमक्या मिळाल्या होत्या. मी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे माझे कुटुंब अस्वस्थ झाले आहे.”
“काल रात्री जे लोक माझा पाठलाग करत होते, ते आधी सलमान खानच्या घरी गेले होते, तिथे कोणीतरी त्यांना झीशान सिद्दीकीला भेटायला सांगितले होते, असे पोलिसांचे म्हणणं आहे. पण यात सत्य काय आहे, हे मला माहित नाही,” असे सिद्दीकी यांनी म्हटले. आधी मिळालेल्या धमक्यांबाबतही पोलीस कोणतीही ठोस माहिती देत नाही”, असा आरोप त्यांनी केला.
या सर्व घटनांमुळे माझे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जावी, यासाठी मी लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. या घडामोडींमुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.