Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्याने वाद, हर्षवर्धन सपकाळांची पत्रकार परिषद सुरु असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरु असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले.

राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणून टीका केली. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापत चाललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरु असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले. “आज आम्ही त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो आहोत. ज्या काँग्रेसच्या एक्स पोस्टवरुन सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणून हिणवलं, त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी. आमचं भांडणं काँग्रेसशी नाही. ज्याने कोणी पोस्ट केली त्याच्याविरोधात आंदोलन आहे. हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी” अशी मागणी काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.
“वहिनी सिद्ध करतील. त्यांनी सिद्ध केलय. एकीकडे तुम्ही महिलेच्या सन्मानाची भाषा करता आणि दुसरीकडे महिलेचा असा अपमान करता. ही दुटप्पी भूमिका काँग्रेसने बंद करावी.एकीकडे तुम्ही दुर्गा झाली पाहिजे म्हणता आणि दुसरीकडे दुर्गेचा अपमान करण्याचं काम करता. तुम्ही काँग्रेसचे प्रांताध्यक्ष या नात्याने जबाबदारी स्वीकारुन माफी मागितली पाहिजे. यासाठीच आम्ही आलो आहोत” असं राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण म्हणाले.
एखाद्याला हिणवणं तुमची संस्कृती आहे का?
“वहिनी अर्थ खातं असेल इतर मुद्यांवर बोलत नाहीत असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यावर राष्ट्रवादीचा पदाधिकारी उत्तर देताना म्हणाला की, 100 टक्के सगळे प्रश्न मार्गी लागतील. तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन विचारु शकता. एखाद्याला हिणवणं तुमची संस्कृती आहे का?.सगळ्या प्रश्नांवर वहिनी बोलतायत. कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना ऐकू येत नसेल, त्यांचे कान बहिरे झाले असतील म्हणून त्यांना ऐकू येत नसेल. वहिनींनी सर्व प्रश्नांवर उत्तरं दिली आहेत. आपल्या सोयीचं, फायद्याचं टि्वट काढायचं आणि टाकायचं” अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली.
आता ते चर्चा करणार की पळून जाणार
“महिलेला कमी लेखणं ही काँग्रेसची भूमिका आहे का? हे हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर करावं. आम्ही यासाठीच त्यांना इथे भेटण्यासाठी आलो आहोत. त्यांची भूमिका सपकाळ यांनी स्पष्ट करावी. नाहीतर इथेच बसून राहणार. चर्चा करायला आलो आहोत. आता ते चर्चा करणार की पळून जाणार ते आम्हाला पहायचं आहे” असं सूरज चव्हाण म्हणाले.
वहिनी सुद्धा इतिहास रचतील
“काँग्रेसला कदाचित इंदिरा गांधी यांच्या विचारांचा विसर पडला असावा. इंदिराजींनी इतिहास रचला होता. वहिनी सुद्धा इतिहास रचतील. तुमची मानसिकता तुमच्या एक्स पोस्टवरुन दिसते. आज महिलेला कमी लेखलत म्हणून जाब विचारण्यासाठी आलो आहोत” असं राष्ट्रवादीचे पदाधिकारी सूरज चव्हाण म्हणाले.