Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या घाईतील शपथविधी मागे तटकरे, पटेल नाही? मग कोण?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा काय?

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या घाईतील उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीमागे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल नाहीत, असा मोठा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पवार कुटुंबियांच्या इच्छेमुळेच हा शपथविधी झाल्याचे मुश्रीफ म्हणाले. विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार निर्णय घेतल्यास पक्षाला तो मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या घाईतील शपथविधी मागे तटकरे, पटेल नाही? मग कोण?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा काय?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
| Updated on: Feb 07, 2026 | 11:35 AM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या शपथविधीवरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. इतक्या घाईत शपथविधी करायची गरज काय होती? उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक पद नसताना घाई का? शरद पवारांचा राष्ट्रवादीवर वरचष्मा वाढू नये म्हणून हे केलंय का? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ नये म्हणून शपथविधीचा घाट घातला का? असे असंख्य प्रश्न उपस्थित केले गेले. या शपथविधीवरून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे यांना व्हिलन ठरवण्यात आले. या खेळीमागे तटकरे आणि पटेल असल्याचं बोललं जात होतं. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी हा पक्षाचा निर्णय असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता यात मोठी माहिती समोर आली आहे. अजितदादाच्या राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्याने या घाईच्या शपथविधी मागे तटकरे आणि पटेल नसल्याचं सांगून तिसरंच नाव घेतलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी घाईच्या शपथविधीवरून मोठा खुलासा केला आहे. पवार कुटुंबीयांची भूमिका होती की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनी यांचा शपथविधी व्हावा. पवार कुटुंब हे पुरोगामी कुटुंब आहे. त्यामुळे तीन दिवस झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दादा आपल्यातून अचानक गेले. पक्षाचा प्रमुख अचानक गेल्यावर प्रदेशाध्यक्षाने पक्षाची मीटिंग बोलवायची असते. मग यामध्ये सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल व्हिलन कसे? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला.

सुनेत्रा वहिनींच्या निर्णयाला पाठिंबा

जी विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाली ती अजितदादांच्या सोबत झाली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही नेतेमंडळी कोणीही नव्हतो. जर सुनेत्रा वहिनी यांनी विलिनीकरणासंदर्भात भूमिका घेतली तर आमची तयारी असेल. पक्ष निर्णय घेईल हीच भूमिका हसन मुश्रीफ यांची असेल. जर सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरणाबाबत निर्णय घेतला तर आम्हाला त्यासोबत राहावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

राऊतांची लुडबुड नको

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा वेगळा पक्ष आहे. त्यामुळे यामध्ये आता कोणीही लुडबुड करू नका. संजय राऊत अशा पद्धतीची लुडबुड का करतात हे मला कळत नाही. आम्ही दुःखात असताना असं करणं हे योग्य नाही. जे घडलं होतं ते मी बोललो होतो. संजय राऊत यांना ते का लागावं? हे मला माहित नाही, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

चौकशीतून सर्व समोर येईल

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर ॲटम बॉम्ब पडावा अशा पद्धतीचे वातावरण झालं आहे. जे लोक अजितदादांच्या मृत्यूवर शंका उपस्थित करतात त्यांना चौकशीमध्ये काय समोर येतं हेच उत्तर आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं हे समोर येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राऊत यांचे अभिनंदन

पवार कुटुंब हे एकत्र आहे, एकत्र होतं. अजित दादा यांच्या विधीच्या प्रसंगी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं, असंही ते म्हणाले. संजय राऊत शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवणार आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असं सांगतानाच युतीचे घटक असताना देखील रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका करत आहेत हे बरोबर नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील हीच भूमिका बोलून दाखवली, असंही ते म्हणाले.

आम्हाला मागेल ती समिती…

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला वजा करून राजकारण करता येणार नाही. आम्ही मागेल ती समिती त्यांना द्यावी लागेल. शिवसेना आणि भाजप पक्षाचे आभार मानतो. त्यांनी सर्व भूमिका मला विचारून घेतल्या, असंही त्यांनी सांगितलं. नऊ वर्षांनी जिल्हा परिषद निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता आहे. या निवडणुकीमध्ये अजितदादांबद्दल मतदार सहानुभूती दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.