ATS पहाटे पहाटेच घरांमध्ये घुसली… भिवंडीच्या बोरिवली आणि पडघ्यात जोरदार छापेमारी; मोठी खळबळ

भिवंडीच्या पडघा नजीकच्या बोरिवली गावात NIA, ATS, ED ने दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणी मध्यरात्रीपासून छापे टाकले आहेत. कुख्यात साकिब नाचण याच्या निधनानंतरही गाव चर्चेत आले आहे. या छाप्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ATS पहाटे पहाटेच घरांमध्ये घुसली... भिवंडीच्या बोरिवली आणि पडघ्यात जोरदार छापेमारी; मोठी खळबळ
ATSची जोरदार छापेमारी
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 11, 2025 | 11:29 AM

भिवंडी तालुक्यातील पडघा नजीक असलेल्या बोरिवली गावात काल रात्रीपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणा, तसेच एटीएस (ATS) आणि ईडीच्या (ED) पथकांनी छापा टाकला आहे. या तिन्ही पथकांच्या अधिकाऱ्यांनी बोरिलीमधील काही घरांमध्ये छापेमारी केली. दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी ईडी व एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते. मध्यरात्रीपासूनच हे छापासत्र सुरू आहे.

दहशतवादी कृत्यात सहभागी असलेला कुख्यात साकिब नाचण याचे 28 जून रोजी निधन झालं होतं, त्यानंतर हे गाव शांत झाल्याचं दिसत होतं. मात्र असं असतानाच आता एटीएसने छापा टाकल्याने मोठी खळबळ माजली असून के पडघा नजिकचं हे बोरिवली गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका दहशतवादाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ईडी, एटीएसकडून तपास सुरू आहे. त्याच तपासाचा भाग म्हणून पडघ्यातील बोरिवली गावात घरांवर मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपूर्वी केलेल्या कारवाईत याच गावातून साकिब नाचण आणि त्याचा मुलगा याच्यासह एकूण 17 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान साकिब नाचण हा कारागृहात असतानाच 28 जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता.

मध्यरात्रीपासून तपासयंत्रणांच्या धाडी

भिवंडीतील पडघा गावाला लागून असलेल्या बोरीवली येथे गुरुवारी रात्रीपासूनच छापे टाकण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही कारवाई मागील कारवायांवर आधारित आहे. पडघा येथील बोरिवली गावात सुरुवातीला छापा टाकण्यात आला. अनेक संशयितांच्या घरांची झडती घेतली जात आहे आणि ईडीकडून संशयास्पद पैशांच्या व्यवहारांची चौकशी केली जात आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रक्रियेत एटीएस ही केंद्रीय तपास यंत्रणेला मदत करत असल्याचेही अधिकाऱ्याने नमूद केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, साकीब नाचण याने पडघ्या जवळील बोरिवली हे गाव वेगळा देश म्हणून घोषित केलं होतं. पडघा गावाने या प्रांताला इस्लामिक स्टेट घोषित स्वतंत्र देश आणि स्वतंत्र राज्य घटना तयार केली होती अशीही धक्कादायक माहिती समोर आली होती. अल शाम असं नाव या गावाला देण्यात आले होतं, त्यामध्ये साकीबने स्वतःची राज्यघटना, स्वतःचे मंत्रीमंडळ साकीबने तयार केले होते असेही समजते.

याच गावावर आता एटीएस, तपास यंत्रणा आणि  ईडीच्या पथकांनी छापा टाकला असून अनेक घरांची झडती घेण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजकावर ईडीचे छापे

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सचिन पाकळे यांच्या खेड आणि चिपळूण सावर्डे इथल्या कंपनीवर ईडीने छापे टाकले.  पहाटेपासून ईडीची छापेमारी सुरू असून यासंदर्भात मोठी गुप्तता बाळगण्यात आली.  ईडीने एकाच वेळी खेड भरणे नाका येथील कंपनीवर आणि सावर्डे इथल्या मुख्य कार्यालयावर छापेमारी केली. मात्र यामागचं नेमकं कारण काय ते अद्याप अस्पष्ट आहे.