Nitin Deshmukh: पक्षफुटीच्या घटनाक्रमावर नितीन देशमुखांचा मोठा दावा; असीम सरोदेंना दिलं प्रत्युत्तर, म्हणाले- आधीच सांगितला होतं…
Nitin Deshmukh Reply to Asim Sarode Statement: असीम सरोदेंच्या वक्तव्यावर नितीन देशमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्षफुटीच्या घटनाक्रमावर मोठा दावा केला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील पक्षफुटीच्या घटनाक्रमावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अॅड. असीम सरोदे यांनी आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्याकडे पक्षफुटीच्या काळातील महत्त्वाची माहिती होती. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला असता तर न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करता आले असते, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावर आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नितीन देशमुख यांनी असीम सरोदेंच्या वक्तव्याला उत्तर देताना आपण त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आधीच सार्वजनिक केली होती, असं सांगितलं. सुरत येथे असतानाच आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात काय घडलं, याची माहिती आपण गुवाहाटीहून परतल्यानंतर दिली होती, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.
गुवाहाटीहून परतल्यानंतर अकोला आणि मुंबई येथे पत्रकार परिषदा घेऊन आपण संपूर्ण घटनाक्रम मांडला होता. सुरत येथे नेमकं काय घडलं, आपल्याबाबत कोणत्या बातम्या पसरवण्यात आल्या आणि पक्षफुटीच्या काळात कोणत्या घडामोडी सुरू होत्या, याबाबत आपण त्यावेळीच भूमिका मांडली होती, असा दावा नितीन देशमुख यांनी केला.
मात्र त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या घडामोडी घडत होत्या. त्यामुळे आपण पत्रकार परिषदेत मांडलेला घटनाक्रम कदाचित अॅड. असीम सरोदेंच्या लक्षात आला नसावा, असंही देशमुख म्हणाले. शिवसेनेतील फुटीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरून न्यायालयीन लढाई आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरू आहेत. असीम सरोदेंच्या वक्तव्यामुळे या प्रकरणातील तत्कालीन घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यावर नितीन देशमुख यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आता या मुद्द्यावर नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.