Navnath Waghmare : वाघमारेला ठोकणाऱ्याची केस फुकटात लढीन, वकिलाची घोषणा
मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये जोरदार शाब्दीक बाचाबाची सुरु आहे. काहीवेळा अत्यंत खालच्या भाषेत परस्परांवर टीका केली जात आहे.

ओबीसी समाजाच्या न्याय, हक्कासाठी आवाज उठवणारे त्यांचे नेते नवनाथ वाघमारे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरुन मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात’ असं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचे मराठा समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. नवनाथ वाघमारे यांनी हे असं वक्तव्य करुन नव्या वादाला जन्म दिला आहे. मराठा मुलींबद्दल नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात महाराष्ट्राच्या विविध भागात, जिल्ह्यांमध्ये आंदोलनं सुरु झाली आहेत. या दरम्यान एका वकिलाने वाघमारेला ठोकणाऱ्याची केस फुकटात लढीन अशी घोषणा केली आहे.
“नवनाथ वाघमारे तू लय मोठी चूक केली. आमच्या आई-बहिणीवर खालच्या भाषेत बोललास. याआधी बोललेल्या गोष्टी विसरुन समजुतीने घेतलं. तुला मारताना मीच वाचवलं. पण यापुढे तुला जो कोणी ठोकेल त्याची केस फुकटात लढू” असं वकिल योगेश केदार यांनी जाहीर केलं आहे. “आज अंतरवलीत होणाऱ्या अभ्यासकांच्या बैठकीला मी देखील उपस्थित राहणार आहे. मतभेद बाजूला सारुन, शेवटी समाजाचे हित महत्वाचे मानून, आरक्षणावर कायदेशीर तोडगा सांगण्याचा प्रयत्न करेन” असं योगेश केदार यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये जोरदार शाब्दीक बाचाबाची सुरु आहे. काहीवेळा अत्यंत खालच्या भाषेत परस्परांवर टीका केली जात आहे. माकडया वैगेरे असे शब्द वापरले जात आहेत. आता नवनाथ वाघमरे यांनी त्यापुढे जात मराठा समाजातील मुलींबद्दल नको ते वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटणं स्वाभाविक आहे. मनोज जरांगे पाटील यांनी वाघमरेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, ‘मी लेकींवर बोललो नाही. तुम्ही वाईट थराला गेलात. मराठेही त्याचं भाषेत उत्तर देणार’.
याला टकमक टोकावरुन ढकलून दिलं पाहिजे
“स्वत:ला ओबीसींचा नेता समजणाऱ्या तथाकथित नवन्या चिलटमारेने मराठा समाजाच्या मुलीबद्दल अत्यंत अशलाघ्य टीका केली. नवन्या वाघमाऱ्या चिलटमारे याच्या जीभेत शिसं ओतलं पाहिजे. याला टकमक टोकावरुन ढकलून दिलं पाहिजे. आम्ही त्याच्या वक्तव्याचा निषेध करतो. अशा औलादींना महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे” अशी मागणी मराठा समाजाच्या नेत्याने केली आहे.