ओबीसींना डावलून मराठा समाजाला सुविधा दिल्यास… बबनराव तायवाडेंचा सरकारला गंभीर इशारा

Babanrao Taywade : मराठा समाजासाठी सरकार आता 8 योजना सुरू करणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही अनेक सवलती मिळणार आहेत. यावर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसींना डावलून मराठा समाजाला सुविधा दिल्यास... बबनराव तायवाडेंचा सरकारला गंभीर इशारा
Babanrao Taywade on Maratha 8 Scheme
Image Credit source: Google
| Updated on: Jun 05, 2026 | 8:58 PM

राज्य सरकारने राज्यातील मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी सरकार आता 8 योजना सुरू करणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही अनेक सवलती मिळणार आहेत. या सवलती शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत असणार आहेत. यावर आता ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी सरकारलाही गंभीर इशारा दिला आहे. तायवाडे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

सरकारच्या निर्णयाचं स्वागत – तायवाडे

मराठा समाजासाठी सरकारने 8 योजनांची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना बबनराव तायवाडे यांनी म्हटले की, ‘मी त्या निर्णयाचा अभिनंदन करतो, समाजामध्ये वेगवेगळ्या घटक असतात. एससी, एसटी असो किंवा मराठा समाज असो किंवा कुठलाही एखादा समाज पुढे येईल, त्याचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी सोयी आणि सुविधा पुरवणे सरकारचा कर्तव्य आहे. त्या लोकांना सोयी सुविधा पुरवणे सरकारचं काम असते. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती देण्यात येईल असा हा निर्णय आहे, यात आमचे कुठलंही नुकसान नाही, त्या समाजात सुद्धा उत्तम व्हावं त्यासाठी आम्ही त्या स्वागत करू.

पुढे बोलताना तायवाडे यांनी म्हटले की , ‘मी त्यामध्ये दोन सोयी आणि सवलती अशा वाचल्या ज्या अजून पर्यंत ओबीसी समाजाला लागू झाल्या नाही, त्या मराठा समाजाला कशा लागू होतील? जे विद्यार्थी पर राज्यात शिकायला जातात त्यांना फ्रीशिप लागू करण्याचा निर्णय अजून पर्यंत सरकारने घेतला नाही, तो सुद्धा मराठा समाजाला लागू होईल असं त्यात म्हटलं आहे. मग जो ओबीसीलाच लागू नाही तो त्यांना कसा लागू होईल?

त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॅप मंजूरी देते, त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, ही योजना सुद्धा ओबीसी विद्यार्थ्यांना लागू नाही. ती योजना ओबीसी आणि मराठा समाजाला लागू करण्यासाठी निर्णय काढावा असे मागणी मी करतो आणि तो काढल्यास मी त्याचा अभिनंदन करतो.

ओबीसींनाही मराठ्यांच्या सुविधा द्या

पुढे बोलताना तायवाडे यांनी म्हटले की, ‘यामध्ये जो शब्दप्रयोग वापरला आहे, ज्या ज्या सोयी सुविधा ओबीसी समाजाला देण्यात येतात त्या मराठा समाजातील युवकांना सुद्धा देण्यात येणार आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारकडे एक विनंती करतो, ज्या सोयी आणि सवलती ओबीसी समाजाला दिल्या जात नाही पण मराठा समाजाला दिल्या जात आहेत, त्या ओबीसी समाजाला सुद्धा देण्यात याव्या आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा. दोन्ही समाजाला सुविधा देण्यात याव्यात याला आमचा काही विरोध नाही. त्यांच्या सोयी आणि सवलती आम्हाला सुद्धा मिळवण्याचा अधिकार आहे असं निवेदन मी सरकारला देणार आहे.’

दोन्ही समाजाला समान सुविधा द्याव्यात

ओबीसीला लागू झाल्याशिवाय त्या दोन्ही सुविधा मराठा समाजाला लागू होणार नाही, आधी ओबीसी समाजासाठी शासनाने निर्णय काढावा आणि मग मराठा समाजाला लागू करावा. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र निर्णय काढला म्हणून आम्हाला त्यावर बोलावं लागलं. ज्या सुविधा ओबीसी समाजाला मिळत आहेत त्याच मराठा समाजाला मिळावा असं वाटत असेल तर त्या दोन्ही समाजाला सारखं मिळावं अशी आमची मागणी आहे.

तायवाडेंकडून आंदोलनाचा इशारा

पुढे बोलताना तायवाडे यांनी सांगितले की, ‘ज्या दिवशी या महाराष्ट्रात एसीबीसीचे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू करण्यात आलं, त्या दिवशीपासून बहुतांश सुविधा या मराठी समाजातील युवकांना लागू करण्यात आल्या आहेत. ज्या सुविधा ओबीसी समाजाला दिल्या जातात, त्या मराठा समाजाला देण्यात आमचं काही म्हणणं नाही. पण आम्हाला डावलून त्यांना जर देणार असाल तर मात्र आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल. कारण हा नवीन पायंडा पडला आहे, ज्या सोयी आणि सुविधा ओबीसीला मिळतात त्या मराठा समाजाला मिळाव्या अशी मागणी होती. त्याच धर्तीवर मराठा समाजाला मिळणाऱ्या सुविधा ओबीसी समाजातील युवकांना सुद्धा लागू कराव्या असं आमचं म्हणणं आहे.’

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us