
भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील ओलाच्या विक्रीसंदर्भात ही बातमी आहे. ओला कंपनीचे राज्यातील 90 टक्के शोरूम बंद होणार आहेत. दरम्यान, यामागचं नेमकं कारण तरी आहे काय, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. ‘मिंट’च्या म्हणण्यानुसार, कंपनीचे महाराष्ट्रातील जवळपास 90 टक्के शोरूम बंद होणार आहेत. राज्यात ओलाचे 460 शोरूम आहेत, पण त्यापैकी बहुतेकांकडे वाहने ठेवण्यासाठी आवश्यक परवाने (ट्रेड सर्टिफिकेट) नाहीत. या पार्श्वभूमीवर सरकारने आपली कारवाई सुरु केली आहे. याचा परिणाम भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील ओलाच्या विक्रीवर होऊ शकतो. टीव्हीएस आणि बजाज ऑटोनंतर कंपनी तिसऱ्या स्थानावर घसरली आहे.
कंपनीने नियमांचे पालन केले नाही?
3 जुलै रोजी महाराष्ट्राच्या परिवहन विभागाने 432 शोरूमची तपासणी केली होती. त्यापैकी केवळ 44 शोरूमकडे ट्रेड सर्टिफिकेट होते, तर उर्वरित 388 शोरूमकडे हे प्रमाणपत्र नव्हते. खरं तर ट्रेड सर्टिफिकेट हा एक नियम आहे, जो शोरूममध्ये नोंदणी नसलेली वाहने ठेवण्यासाठी आणि विकण्यासाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2.12 लाख इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली होती. हे प्रमाण देशातील सर्वाधिक आहे. ओलाने गेल्या वर्षी 3.44 लाख स्कूटरविकल्या होत्या. त्यापैकी 12 टक्के विक्री महाराष्ट्रात झाली. पण आता कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सर्व्हिस सेंटरचा अभाव आणि नोंदणीतील अडथळा यांचा समावेश आहे.
यापूर्वीही एप्रिलमध्ये 121 शोरूम बंद करण्यात आले
ओलाचे देशभरात 4,436 शोरूम आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात परिवहन विभागाने 121 शोरूम बंद करून 270 शोरूमना नोटिसा पाठवल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात कंपनीने सांगितले होते की, नोंदणीतील अडचणींमुळे त्यांच्या विक्री आणि नोंदणीच्या आकडेवारीत तफावत होती. जूनमध्ये ओलाने 20,120 स्कूटर विकल्या, तर टीव्हीएस आणि बजाजने 25,407 आणि 23,119 स्कूटर विकल्या. कंपनीच्या चेअरपर्सनचे म्हणणे आहे की, रेग्युलेटरी प्रॉब्लेम्स संपले आहेत, पण समस्या अजूनही कायम आहेत.
ओलाने जाहीर केले तिमाही निकाल
या सर्व पार्श्वभूमीवर ओलाने सोमवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा तोटा 428 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 347 कोटी रुपये होता. मात्र, मागील तिमाहीतील (जानेवारी-मार्च 2025) 870 कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा हा तोटा कमी आहे.
कंपनीचे उत्पन्न 49.6 टक्क्यांनी घटून 828 कोटी रुपयांवर आले आहे. गेल्या वर्षी तो 1,644 कोटी रुपये होता. पण गेल्या तिमाहीतील 611 कोटी रुपयांपेक्षा ते चांगले आहे. बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर आणि एथर एनर्जी या कंपन्यांकडून कडवी स्पर्धा असल्याने विक्रीत मोठी घट झाली. या तिमाहीत ओलाने 68,192 स्कूटरची विक्री केली. गेल्या वर्षी हा आकडा 1 लाख 25 हजार 198 होता.
कंपनीचा एबिटडा तोटा 237 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी तो 205 कोटी रुपये होता. मार्जिन -28.6% होते. पूर्वी तो 12.5 टक्के होता. ऑटो सेगमेंटचा एबिटडा 11.6 टक्के होता. मागील तिमाहीत तो 90.6 टक्के होता. वाहन व्यवसाय एबिटडा जूनमध्ये प्रथमच सकारात्मक आहे. ग्रॉस मार्जिन 18.4 टक्क्यांवरून 25.8 टक्क्यांवर पोहोचले.
ओलाने सांगितले की, खर्च कमी करण्यासाठी प्रोजेक्ट गोल सुरू केले, ज्यामुळे वाहन परिचालन खर्च 178 कोटी रुपयांवरून 105 कोटी रुपयांवर आला. 2025-26 मध्ये 3.25 ते 3.75 लाख वाहने विकण्याचे आणि 4,200 ते 4,700 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. शेअरचा भाव 40.01 रुपये होता. त्यात 0.48 टक्के वाढ झाली आहे.