Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात

एकनाथ शिंदे गटाचे 'ऑपरेशन टायगर' आणि ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीच्या चर्चा संजय राऊतांनी फेटाळल्या आहेत. राऊतांनी खोचक टीका करत म्हटले की, फडणवीस स्वतः शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार एकसंध असून, फुटीच्या बातम्या मूर्खपणाच्या आहेत. विरोधकांना विकास निधी नाकारण्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू - ऑपरेशन टायगरवरून राऊतांचा घणाघात
संजय राऊतांचा घणाघात
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 10, 2026 | 10:22 AM

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून फडणवीसांशी हातमिळवणी करत महायुतीचं सरकार स्थापन केलं. तेव्हा अनेक खासदार, नेते, आमदार, पदाधिकारी शिवसेना ठाकरे गट सोडून गेले होते. आता राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ राबवलं जाणार असून एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाकरे गटाच्या 8 खासदारांशी संपर्क साधला, ठाण्यात त्यांची भेट घेतली अशी चर्चा आहे. त्यामळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसू शकतो, असंही बोललं जात आहे. मात्र शिंदेंच्या या ऑपरेशन टायगर बद्दल प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली. शिंदेच्याच पक्षाच सध्या देवेंद्र फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू आहे, अस म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरच्या सर्व चर्चा फेटाळून लावत हे हास्यास्पद असल्याते म्हटले आहे.

फडणवीस करतायत शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन

शिंदेंनी 9 पैकी 8 खासदारांशी संपर्क साधला आहे, असं म्हटलं जातं, त्यात अनेकांचं नाव येतंय, ऑपरेशन टायगर बद्दल वारंवार बोललं जातंय, असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. ‘बघा ऑपरेशन जे असतं ना ते एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेडबॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेडबॉडी नेतात ना.. आणि डेडबॉडी सध्या त्यांच्या पक्षाची ( शिंदे गट) देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खर म्हणजे ऑपरेशन सध्या जे सुरू आहे, ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं करत आहे, ‘ अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

या बातम्या मूर्खपणाच्या..

शिवसेनेचे 9 खासदार, हे एकजुटीने एकत्रित आहेत. काही नावं ऐकून मलाच हसायला आलं. कुठेतरी ते छापून आलं, मला पाठवलं ते. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं आहे. ज्या कोणी ही बातमी दिली आहे, त्याने स्वत:चं हसं करून देणारी बातमी दिली आहे. कोणाकोणाची नावं त्यात टाकलीत, उद्या माझंही नाव त्यात टाकतील, आमच्या आदित्य ठाकरे यांचंही नाव टाकतील ना. काही नाही सध्या अशा ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, वातवरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोड करतोय हे दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे, असं राऊत म्हणाले. लोकसभेतले 9 खासदार हे घट्ट आहेत, याचा त्यांनी ठामपणे पुनरुच्चार करत ऑपरेशन टायगरच्या बातम्या थेट फेटाळून लावल्या.

तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का ? 

काही अडचणी आहेत, त्या म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रात अजिबात विकासाचा निधि दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोट्यवधी निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर लोकांना निधीपासून वंचित ठेवता. तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का ? असा सडेतोड सवाल राऊत यांनी यावेळी विचारला.

मोदी असतील तोपर्यंतच फडणवीसांचं अस्तित्व राहील 

देवेंद्र फडणवीसांना जरा राजकारणात, राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही, तत्व मानतो म्हणून विरोध पक्ष, त्याचे आमदार, खासदार यांनाही समान न्याय देईन, ही भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे, तरचं त्यांना मोठी झेप घेता येईल. नाहीतर त्यांचं जे राजकीय अस्तित्व आहे, जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी आहेत, तोपर्यंतच ते महाराष्ट्रात राहील, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांना सुनावलं.

Follow Us