आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, संभाजी छत्रपतींनी चळवळीचं नेतृत्व करावं; चंद्रकांतदादांचं आवाहन

| Updated on: Oct 14, 2021 | 3:02 PM

खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्यभर दौरे करणार आहेत. संभाजीराजेंच्या या निर्णयाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे. (chandrakant patil reaction on sambhaji chhatrapati maharashtra tour)

आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, संभाजी छत्रपतींनी चळवळीचं नेतृत्व करावं; चंद्रकांतदादांचं आवाहन
chandrakant patil
Follow us on

कोल्हापूर: खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्यभर दौरे करणार आहेत. संभाजीराजेंच्या या निर्णयाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे. आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे संभाजीराजेंनी लक्षात घ्यावं, असं सांगतानाच संभाजीराजेंनी या चळवळीचं नेतृत्व करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. संभाजी छत्रपती यांनी घेतलेल्याल निर्णयाचं स्वागत करेन. अभिनंदन करण्याइतका मी मोठा नाही. संभाजीराजेंकडून फार मोठी अपेक्षा आहे. या चळवळीला कुणी तरी नेतृत्व देण्याची गरज आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं तेव्हा सर्व संघटना रणांगणात उतरल्या होत्या. भाजपही उतरली होती. मराठा आंदोलनात भाजप उतरली. पण भाजप राजकीय पक्ष असल्याने त्याला राजकीय रंग दिला गेला. मात्र, संभाजी राजे हे पक्षांच्यावर आहेत. त्यांनी नेतृत्व केलं तर या चळवळीला बळ येईल. हे सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. संभाजी राजेंनी हे लक्षात घ्यावं. सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. ते त्यांनी करावं, असं पाटील म्हणाले.

मी अॅथोरिटी नाही

यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नवाब मलिक यांनी एनसीबीवर जे काही आरोप केले त्यावर बोलायला मी काही अॅथोरिटी नाही. त्यांनी ज्यांच्याबद्दल म्हटलंय त्या यंत्रणेने उत्तर दिलं आहे. इतक्या मोठ्या यंत्रणेवर आघात केल्याने ती यंत्रणा रेग्यूलर प्रेस रिलीज काढतेय. आजच्या संदर्भातीही ते प्रेस रिलीज काढतील, असं त्यांनी सांगितलं.

ते विधान योग्य नाही

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेवरही भाष्य केलं. शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर पहिल्यांदाच धाडी पडल्यात असं सांगितलं जातंय. इन्कम टॅक्सची धाड पडणं सीबीआयकडून चौकशी होणं हे कॉमन आहे. बाकीच्यांच्या ठिकाणी झालं तर चालतं. तुमच्यावर झालं तर सूड उगवण्याचा भाग आहे… अधिक वेळ थांबले… पाहुणे पाहुणाचार घेत आहेत… असं म्हणणं योग्य नाही. पण पवार ज्या यंत्रणांबाबत बोलले त्या यंत्रणांनी उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले.

रुपालीताईंबाबत चित्राताईंनाच अधिक माहीत

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रुपाली चाकणकर या चित्राताई वाघ यांच्या राष्ट्रवादीतील जुन्या सहकारी आहेत. त्यामुळे त्यांनी काही अनुभवाच्या आधारेच विधान केलं असेल. उशिरा का होईना आणि रुपालीताई का होईना कुणी तरी अध्यक्ष होतंय हे महत्त्वाचं आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे अध्यक्ष नेमणं महत्त्वाचं आहे. रुपालीताई कशा आहेत हे चित्राताईंना जास्त माहीत असल्याने त्यांनी ट्विट केलं असावं, असा चिमटाही त्यांनी काढला.

राऊत महान व्यक्तिमत्व

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. महिला नेत्या काम करतात हे त्यांना दिसतं. कारण अदृश्य काम आहे. त्यांना अदृश्य डोळे आहेत. आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्हाला दिसत नाही म्हणून म्हटलं. काय करणार ते महाभारतातील संजय आहेत. त्यांना सर्व दिसतं. महान व्यक्तीमत्त्व आहेत राऊत, असा टोलाही त्यांनी हाणला.

 

संबंधित बातम्या:

उद्याचा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीचा, वर्गाचा नाही, हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा मेळावा: पंकजा मुंडे

मुंबई उच्च न्यायालयाचा मंदाकिनी खडसे यांना दिलासा, तूर्तास अटक न करण्याचे आदेश

कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही, त्याची आठवणही काढत बसत नाही; पंकजा मुंडेंचा टोला कुणाला?

(chandrakant patil reaction on sambhaji chhatrapati maharashtra tour)