
चंद्रपूर : विदर्भातील झाडीपट्टी नाटकात सिने अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी भूमिका साकारली. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे अनासपुरे यांच्या हस्ते झाडीपट्टीतील गद्दार नाटकाचे पुस्तक प्रकाशन देखील पार पडले. झाडीपट्टी रंगभूमीवर (Rangbhumi) लेखी स्वरूपात उपलब्ध झालेल्या मोजक्या पुस्तकात गद्दार चा समावेश झालाय. विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे अनुभवी नाट्यलेखक आनंद भीमटे यांचे ‘गद्दार’ हे नाटक आता पुस्तक रुपात आले. त्याचे प्रकाशन मररंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शंकरपूर येथे थेट रंगमंचावरच हा सोहळा पार पडला. या वेळी पद्मश्री परशुराम खुणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विशेष म्हणजे गद्दार या नाटकात मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी हे नाटक देखील सादर करण्यात आले. मकरंद अनासपुरे यांनी झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ कलावंत परशुराम खुणे यांना मिळालेल्या पद्मश्रीबद्दल आनंद व्यक्त केला. या रंगभूमीचा मुख्य प्रवाहात समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यकर्त्यांनी झाडीपट्टी रंगभूमी बहरावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज अनासपुरे यांनी व्यक्त केली.
दीडशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवर लेखी स्वरूपातील नाट्यसंहिता उपलब्ध नव्हत्या. त्याची गरज व्यक्त होत असतानाच झाडीपट्टीतील अनुभवी नाट्य लेखक प्रा. आनंद भीमटे यांनी गद्दार हे पुस्तक प्रयत्नपूर्वक लिहून काढत झाडीपट्टीतील रसिकांप्रती अर्पण केले आहे. हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असल्याच्या भावना भिमटे यांनी व्यक्त केल्या.
मकरंद अनासपुरे हे स्वतः झाडीपट्टी रंगभूमित उतरल्यामुळं आता या रंगभूमीला चांगले दिवस येतील का, असा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चांगले कलाकार लाभल्यास झाडीपट्टी नक्कीच प्रसिद्ध होईल. चार महिने रसिकांपुढे असणाऱ्या मात्र ४ जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंताला पद्मश्री सन्मान मिळाला. राज्य व देशभरातील नाट्य रसिकांचे लक्ष या जिवंत रंगभूमीकडे गेले आहे. या टप्प्यातून आणखी उत्तमोत्तम नाट्यनिर्मिती होत रसिक सेवेत रुजू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.