उस्मानाबादेत मांडूळाच्या तस्करीचा कट उधळला; 6 तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश

| Updated on: Sep 25, 2021 | 9:50 PM

आरोपी मांडूळ सापाचा जादूटोणा करण्याच्या हेतूने विक्री करणार होते. ते मांडूळ विकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी टोळीला रंगेहात पकडून त्यांचा मनसुबा उधळून लावला.

उस्मानाबादेत मांडूळाच्या तस्करीचा कट उधळला; 6 तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश
उस्मानाबादेत मांडूळाच्या तस्करीचा कट उधळला
Follow us on

उस्मानाबाद : अत्यंत दुर्मिळ स्वरूपात आढळणाऱ्या दुतोंडी मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या टोळीचा आज उस्मानाबाद जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात पकडलेल्या मांडुळाची विक्री करण्याच्या हेतूने तस्करांची टोळी ग्राहकांचा शोध घेत उस्मानाबादला आली होती. उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून टोळीतील 6 तस्करांना अटक करण्यात यश मिळवले. जिल्ह्यात मांडूळ सापाच्या तस्करीचे हे पहिले प्रकरण नोंद झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 किलो 500 ग्राम वजनाचा 40 लाख रुपयांचा मांडूळ साप तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. (Mandula smuggling plot foiled in Osmanabad; 6 Smuggling gang exposed)

आरोपी मांडूळ सापाचा जादूटोणा करण्याच्या हेतूने विक्री करणार होते. ते मांडूळ विकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी टोळीला रंगेहात पकडून त्यांचा मनसुबा उधळून लावला. अटक केलेल्या आरोपींवर आनंद नगर पोलीस ठाण्यात वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी अशी केली कारवाई

नाशिक येथील रहिवासी असलेले आरोपी दीपक एकनाथ शिंदे, विजय देवराम कटारनवरे, संदीप बाळासाहेब लोखंडे या चौघांना दोन तोंडी मांडूळ सापडला होता. त्यांनी अधिक पैसे मिळण्याच्या अपेक्षेने उस्मानाबाद गाठले होते. तीन दिवसांपूर्वीच ग्राहक शोधत ते उस्मानाबादमध्ये आले होते. येथे त्यांच्या संपर्कात असलेल्या अब्दुल आझम पटेल (रा.परंडा) आणि रामा भीमा कांबळे (रा.बेगडा) यांनी मदत केली होती. त्यांची गोपनीय खबर लागल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांनी सहायक निरीक्षक निलंगेकर, उपनिरीक्षक पांडुरंग माने तसेच कर्मचारी जगदाळे, चव्हाण, ढगारे, ठाकूर, कोळी, अरब यांचे पथक तयार करुन शुक्रवारी रात्री सर्व सहा आरोपींना उस्मानाबाद बायपास रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले. झडती घेतल्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील मांडूळ पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याची किंमत तब्बल 40 लाख रुपये इतकी असून गुन्ह्यात वापरलेली 7 लाख रुपये किंमतीची कारही पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त केलेला मांडूळ गुन्हे शाखेच्या पथकाने वनविभागाच्या हवाली केला. त्याला सुरक्षितस्थळी सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी दिली आहे.

दुर्मिळ मांडुळाला परदेशात मोठी मागणी

मांडूळ सापाला रेड सँड बोया असे म्हणतात. अत्यंत दुर्मिळ असलेल्या या सापाची तस्करी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सापाला मोठी मागणी आहे. हा साप बिनविषारी असून औषधे, सौंदर्यप्रसाधने तसेच काळ्या जादूमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. हा साप भारतात ईशान्य भाग आणि उत्तर बंगालचा भाग वगळता देशात इतरत्र कुठल्याही भागात सापडतो. (Mandula smuggling plot foiled in Osmanabad; 6 Smuggling gang exposed)

इतर बातम्या

लासलगावमध्ये अॅपे रिक्षा-हायवामध्ये अपघात, पाच जण जागीच ठार

आधी 3 गुणांनी संधी हुकली, आता 466 रँक, कोणताही क्लास न लावता यवतमाळच्या श्रीकांत मोडकने करुन दाखवलं !