पुढचे पंतप्रधान कोण असावेत?, डोंगर, झाडी फेम शहाजी बापू यांनी सांगितलं तुमच्या मनातील नाव

| Updated on: Jan 29, 2023 | 1:48 PM

राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. एकनाथ शिंदे हे राजकीय आणि वैचारिक दृष्ट्याच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे.

पुढचे पंतप्रधान कोण असावेत?, डोंगर, झाडी फेम शहाजी बापू यांनी सांगितलं तुमच्या मनातील नाव
shahajibapu patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर: सध्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यामध्ये निश्चितच पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता आणि शक्ती नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे. शहाजी बापू यांच्या या विधानाने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळेच महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. त्यात भाजप विरोधात जनमत असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हेच पुन्हा सांगितलं. त्यावरही शहाजी बापू पाटील यांनी मत व्यक्त केलं. भाजपा विरोधात जनमत आहे हे शरद पवार साहेबांचं मत व्यक्तिश: आपणास मान्य नाही. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कारभाराबाबत जनता समाधानी आणि सुखी आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला.

हे सुद्धा वाचा

वंचितचा फटका बसणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रंदिवस जनतेसाठी कष्ट करत आहेत. त्यामुळे शिंदे गटाला वंचित आणि शिवसेनेच्या युतीचा कुठेही फटका बसणार नाही. आजपर्यंतचे सर्व सर्व्हे चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे लोकसभेत शिंदे आणि फडणवीस यांच्या उमेदवारांना चांगले बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

तत्त्व सोडून युती

अचानकपणे सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना तत्त्व सोडून अनेकांशी युती करावी लागते आहे. आगामी निवडणुका कशा लढवाव्यात यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ही त्यांची केविलवाणी धडपड आहे, अशी टीका त्यांनी केली.

आघाडीत तणाव

वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.

सार्थ अभिमान

शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघाची लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दखल घेण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या मतदारसंघाची लोकसेवा आयोगाच्या सराव परीक्षेत दखल घेतली जाते याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं त्यांनी सांगितलं.

शिंदे वैचारिक वारसदार

राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. एकनाथ शिंदे हे राजकीय आणि वैचारिक दृष्ट्याच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे तैलचित्र सभागृहात लावून वारसदार होत नाही हे संजय राऊत यांचे मत चुकीचे आहे, असा पलटवार त्यांनी केला.

लवकरच विस्तार

राज्यातील अनेक मतदारसंघात शिंदे फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. योजनाही चांगल्या प्रकारे चालू आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याबाबत शिंदे आणि फडणवीस निर्णय घेतील आणि विस्तार करतील, असं ते म्हणाले.