रयत क्रांती संघटना बीआरएससोबत जाणार काय?, संघटनेचे पांडुरंग शिंदे यांनी केली ही मागणी

| Updated on: Jun 09, 2023 | 5:50 PM

मुठभर व्यापारी संघटित होऊन सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडतात. यामध्ये शेतकऱ्याची माती होते. सोयाबीन, कापूस, कांदा आणि फळे आणि भाजीपाल्याला गेल्या अनेक वर्षापासून कवडीमोल भाव मिळत आहे.

रयत क्रांती संघटना बीआरएससोबत जाणार काय?, संघटनेचे पांडुरंग शिंदे यांनी केली ही मागणी
Follow us on

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती संघटना ही भारत राष्ट्र समितीसोबत येणाऱ्या काळामध्ये जावे. युती करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. नांदेडमध्ये शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाच्या नेत्याकडे केलीय. रयत क्रांती संघटना ही शेतकरी नेते, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी कार्य करत आहे. भारत राष्ट्र समितीचे नेते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी हितासाठी कार्य करतात. त्यांनी तेलंगना राज्यांमध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.

पांडुरंग शिंदे म्हणाले, भारत देश स्वतंत्र होऊन अमृत महोत्सव साजरा करत आहे. 75 वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये राज्यपातळीवर तसेच देशपातळीवर सर्व पक्षाच्या नेतेमंडळीने सत्ता भोगलेली आहे. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, डावे , उजवे या सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण निश्चित नाही. त्यामुळे शेतमालाचे भाव पाडले जात आहेत.

 

हे सुद्धा वाचा

कांद्याला भाव मिळू लागला की निर्यात बंदी करायचे. गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्याचा सोयाबीन घरामध्ये पडून आहे. कारण केंद्र सरकारने खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात केले आहे. कपासाची ही तीच परिस्थिती आहे. मुठभर व्यापारी संघटित होऊन सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडतात. यामध्ये शेतकऱ्याची माती होते. सोयाबीन, कापूस, कांदा आणि फळे आणि भाजीपाल्याला गेल्या अनेक वर्षापासून कवडीमोल भाव मिळत आहे.

राज्यामध्ये वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सरकारचं चुकीचं धोरण असल्यामुळे घडत आहे. आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी तेलंगणा राज्यामध्ये चांगले काम केलेले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष हा म्हणतो आहे, आपकी बार किसान सरकार.

रयत क्रांती शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना

आज 75 वर्षानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याचे सरकार यावं अशी घोषणा के. चंद्रशेखर राव करत आहेत. मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्याचे स्वागत करतो. आमचे नेते सदाभाऊ खोत यांना मी आवाहन करतोय आपली रयत क्रांती संघटना ही शेतकऱ्यांसाठी लढणारी लढाऊ संघटना आहे.

आपण येणाऱ्या काळामध्ये बीआरएस या पक्षासोबत जायला पाहिजे. ही मराठवाडा आणि विदर्भातील कार्यकर्त्यांची, शेतकऱ्याची भावना आहे. भाऊंनी आता भाजपाची संगत सोडून दिली. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पक्षासोबत काम करावे, अशी आम्ही मागणी करत आहोत.

ही मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी कार्यकारिणी पुण्यामध्ये होणार आहे. कार्यकारिणीमध्ये आम्ही ही मागणी भाऊकडे आणि वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहोत. भाऊंनी या आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. येणाऱ्या निवडणुका बीआरएससोबत लढवाव्यात.

यावेळी पत्रकार परिषद रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम वडजे, राहुल ढगे, विशाल सरोदे, राजू हनुमंत, साहेबराव सोनकांबळे, मनोज नागठाणकर उपस्थित होते.