
Sameer Gaikwad Death: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड यांचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शवविच्छेदन झाले वर थोडया वेळाने समोर येणार आहे समीर गायकवाड यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी धडकताच कुटुंबावर शोककळा पसरली.
सनातनचा होता साधक
प्राप्त माहितीनुसार, समीर गायकवाडची तब्येत एकाएक बिघडली. त्यानंतर त्याला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तो उपचारांना कोणताही प्रतिसाद देत नव्हता. दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक होता. कोल्हापुरातील गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात तापसानंतर तो प्रकाशझोतात आला होता. या गुन्ह्यातील तो प्रमुख आरोपी होता. तो सध्या जामीनावर बाहेर आला होता.
11 वर्षांपूर्वी पानसरेंची हत्या
16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे याची हत्या झाली होती. पानसरे यांच्यावर जवळून गोळी झाडण्यात आली होती. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.कोल्हापूरमधील राजकीय, सामाजिक वर्तुळात पानसरे यांचा मोठा प्रभाव होता. ते पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक होते. त्यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक अत्यंत गाजले. त्यात त्यांनी धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेत शिवाजी महाराज यांचे सामाजिक, धार्मिक कार्य समोर आणले.
पानसरे यांच्या हत्या प्रकरणी समीर गायकवाड संशयित आरोपी होता. दहा आरोपींपैकी तो एक होता. त्याला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. समीर गायकवाड हा 4 वर्षांपूर्वी गोविंद पानसरे हत्या प्रकरणात जामीनावर बाहेर आला होता. गेली चार वर्ष तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरी राहात होता. तो पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील महत्त्वाचा दुवा होता. त्याच्या मृत्यूमुळे या प्रकरणावर आणि पुढील तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तो या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानल्या जात होता. या हत्येमागील इतर आरोपींना समोर आणण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयात खटला सुरु आहे.