चंद्रपुरात गडचांदूर नगरपरिषदेचा प्रताप, महाविद्यालय-वाचनालयाशेजारी देशी दारू दुकानाला परवानगी

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेने देशी दारूच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कोरोना काळातही चक्क विशेष ग्रामसभा बोलावल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे नगरपरिषदेने महाविद्यालय आणि वाचनालयापासून काही अंतरावरच या दारू दुकानाला परवानगी दिलीय. त्यामुळे गडचांदूरमधील महिला आक्रमक झाल्यात.

चंद्रपुरात गडचांदूर नगरपरिषदेचा प्रताप, महाविद्यालय-वाचनालयाशेजारी देशी दारू दुकानाला परवानगी


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेने देशी दारूच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कोरोना काळातही चक्क विशेष सभा बोलावल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे नगरपरिषदेने महाविद्यालय आणि वाचनालयापासून काही अंतरावरच या दारू दुकानाला परवानगी दिलीय. त्यामुळे गडचांदूरमधील महिला आक्रमक झाल्यात. या महिलांनी मोर्चा काढत या निर्णयाला आव्हान दिलंय. तसेच हा निर्णय रद्द करण्याची मागणी केलीय. महिलांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेत.

चंद्रपूर जिल्ह्यतील गडचांदूर नगरपरिषदेने जुलै 2021 मध्ये सीएल III देशी दारूच्या दुकान स्थलांतरणास ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क विशेष सभा बोलावली होती. कोरोना काळात लोकहिताचे प्रश्न बाजूला सारून दारूच्या दुकानासाठी बोलाविलेल्या विशेष सभेने नगरपरिषद चांगलीच चर्चेत आली. यावर महिलांनी संताप व्यक्त करत दारू दुकानाला विरोध केला. नगरसेवक सागर ठाकूरवार, वैशाली गोरे, किरण अहिरकर यांनी 30 ऑगस्टला याबाबत अधिवक्ता दीपक चटप यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केस दाखल केली आहे. जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेत मुख्याधिकारी यांच्याकडून अहवाल मागविला आहे.

“50 टक्के महिलांच्या सहमतीशिवायचा ठराव बेकायदेशीर”

या प्रश्नावर बोलताना अॅड. दीपक चटप म्हणाले, “17 ऑगस्ट 2011 च्या शासन निर्णयानुसार देशी दारू दुकानाची अनुज्ञप्ती नगरपरिषद हद्दीत स्थलांतरित करताना प्रभागातील 50 टक्के मतदारांची किंवा महिलांची सहमती घेणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही सहमती देशी दारू दुकानदाराने घेतली नाही. असं असताना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव पारित करणे बेकायदेशीर आहे.”

“जिल्हाधिकारी हा बेकायदेशीर ठराव रद्द करु शकतात”

“देशी दारू दुकानापासून काही अंतरावर महाविद्यालय व वाचनालय देखील आहे. त्यामुळे दुकान सुरू झाल्यास युवकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतील. महिलांवर होणारे अत्याचार देखील वाढतील. बेकायदेशीर ठरावाच्या आधारे दुकान सुरू करण्याची परवानगी देऊ नये. महाराष्ट्र नगरपरिषद कायद्यातील कलम 308 प्रमाणे जिल्हाधिकारी सदरचा ठराव स्थगित व रद्द करू शकतात,” असंही दीपक चटप यांनी सांगितलं.

“दारू दुकानासाठी ना हरकत देणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या फायद्याची चौकशी करावी”

“दिगंबर लांजेकर व कलावती लांजेकर यांच्या देशी दारू दुकानाला गडचांदूर नगरपरिषदेने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे म्हणून विशेष सभा बोलावली. यामागे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना काही आर्थिक फायदा देण्यात आला आहे का? याबाबत देखील चौकशी करावी,” अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. शिवसेनेच्या गडचांदूर नगरपरिषद गटनेता सागर ठाकूरवार म्हणाले, “प्रभागातील महिलांचा विरोध असताना विशेष सभा बोलावून देशी दारू दुकानास ना हरकत प्रमाणपत्र देण्याची लगीनघाई करणे चुकीचे आहे. महिलांची सहमती गरजेची असून दुकान सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करेल.”

गडचांदूर नगरपरिषदेच्या हद्दीत सर्व्हे नंबर 366/1, मालमत्ता क्र. 988 च्या इमारतीत स्थलांतरित होणाऱ्या देशी दारू दुकानास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे म्हणून ठराव बहुमताने पारित झाला आहे. गडचांदूर येथील महिलांनी देशी दारू दुकानास परवानगी देण्याचा ठराव घेणाऱ्या नगर परिषदेतील सत्ताधारी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा विरोध करण्यासाठी 25 ऑगस्ट 2021 रोजी एकदिवसीय उपोषण देखील केले होते. आता जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेतली असल्यानं यावर योग्य निर्णय होईल, अशी आशा नागरिकांना आहे.

हेही वाचा :

चंद्रपूर दारु बंदी उठवण्याच्या विरोधात 100 पेक्षा अधिक संघटना एकटवल्या, मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने सत्याग्रह

तरूणांकडे आज रोजगार नाही, पण दारूची बाटली सहज उपलब्ध करून दिली जातेय : प्रविण दरेकर

‘चंद्रपूरमधील दारूबंदी लागू करा, अन्यथा क्रांती दिनी पुरस्कार परत करणार’, पुरस्कार्थींची घोषणा

व्हिडीओ पाहा :

Special Gramsabha for no objection certificate to alcohol shop in Chandrapur

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI