रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, आधी ट्रकचं चाक फसलं, नंतर प्रशासनाचाच ट्रक पलटी, याहून विदारक वास्तव काय?

| Updated on: Jul 18, 2021 | 4:01 PM

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील चारही बाजूच्या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता अशी सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, आधी ट्रकचं चाक फसलं, नंतर प्रशासनाचाच ट्रक पलटी, याहून विदारक वास्तव काय?
आधी ट्रकचं चाक फसलं, नंतर प्रशासनाचाच ट्रक पलटी
Follow us on

अकोला : राज्यातील सर्वच भागांमध्ये आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसामुळे काही भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. एककीडे पावसाचं पाणी साचल्याचा घटना घडत असताना अकोल्यातील नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे धोके वाढले आहेत. याशिवाय वाहतूक कोंडीची प्रचंड मोठी समस्या उद्भत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळपणाचं दृश्य आता नुकतंच बघायला मिळालं. कारण अकोल्यात एका ठिकाणी खड्ड्यांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा ट्रक पलटी झाला. या दुर्घटनेत सुदैवाने चालकाचा जीव बचावला आहे.

नेमकं काय घडलं?

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील चारही बाजूच्या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता अशी सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तेल्हारा माळेगाव रस्त्यावर आज (18 जुलै) सकाळी एका ट्रकचे चाक रस्त्यामध्ये रुतल्यामुळे ट्रक फसला होता. सदर ट्रक फसल्यामुळे तेल्हारा आणि माळेगावच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. अखेर ट्रकचे रुतलेले चाक काढून रोड मोकळा करण्यात आला होता. पण आज ज्या ठिकाणी ट्रक फसला होता त्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिट्टी मुरुम टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी गिट्टी टाकणारा ट्रक रोडच्या खाली गेल्यामुळे ट्रकच पलटी झाला. यात ट्रेकचे मोठे नुकसान झाले आहे. यात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत ट्रकचालक जखमी झाला आहे.

ड्रायव्हरला काढण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न

संबंधित घटना घडल्यानंतर गाडीतील ड्रायव्हर सुखरुप आहे की नाही? असा प्रश्न प्रत्यक्षदर्शीना सतावत होता. त्यांनी तातडीने गाडीजवळ जाऊन ड्रायव्हर सुरक्षित आहे का नाही? ते पाहिल. नागरिकांनी बाहेरुन ड्रायव्हरला आवाज दिला. यावेळी ड्रायव्हरने आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. ड्रायव्हरला ट्रकच्या कॅबिनमधून काढणं कठीण काम होतं. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोठ्या शिताफीने अखेर ड्राव्हरला ट्रकमधून बाहेर काढलं. या दुर्घटनेत ड्रायव्हर जखमी झाला. त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार करण्यात आला.

ड्रायव्हरला काढण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न

मुक्ताईनगरमध्ये तेलाचा टँकर पलटी

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये काल टँकर अपघाताची एक दुर्घटना समोर आली होती. मुक्ताईनगरच्या घोडसगाव येथे संबंधित दुर्घटना घडली होती. या भागात रस्त्याने जात असताना तेलाचा भलामोठा टँकर पलटी झाल्याची दुर्घटना घडली होती. टँकर पलटी झाल्यानंतर त्यामध्ये असलेलं तेल गळू लागले. अखेर सर्व तेल रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका खड्ड्यात साचले. यावेळी परिसरातील नागरिकांनी संवदेनशीलता न दाखवता घटनेचा फायदा घेतला. त्यांनी सांडलेलं तेल घरी घेऊन जाण्यासाठी तुंबळ गर्दी केली. कुणी हंडा तर कुणी बादली भरुन ते तेल घरी घेऊन गेलं. या घटनेमुळे माणुसकी खरंच मेलीय की काय? असा प्रश्न वाटल्याखेरीज राहणार नाही.

हेही वाचा : मुंबईत 22,483 कुटुंबीय जगताहेत जीवमुठीत घेऊन, 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजनाच नाही; धक्कादायक माहिती उघड