कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांच्यावर आज सायंकाळी पळसखेड येथे अंत्यसंस्कार
Na Dho Mahanor : निसर्गकवितांनी मराठी साहित्याला समृद्ध करणारे प्रसिद्ध कवी पद्मश्री नामदेव धोंडो ऊर्फ ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जन्मगावी अंत्यविधी होणार आहे.

जळगाव | 4 ऑगस्ट 2023 : ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे…अशा निसर्ग कवितांनी मराठी मनावर राज्य गजवणारे निसर्ग कवी ना.धों.महानोर यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जन्मगावी पळसखेड येथे अंत्यसंस्कार होणार आहे. तत्पूर्वी त्यांचा पार्थिव दिवसभर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
महानोर यांचा पार्थिव दाखल
ना. धों. महानोर यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी पळसखेड येथे दाखल झाला आहे. त्यांचा पार्थिव पुण्यावरून औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या त्यांच्या मूळ गावी आणला आहे. पळसखेड येथील आनंद यात्रा या निवासस्थानी ना. धों. महानोर यांचे पार्थिव ठेवण्यात आला आहे. पार्थिव घरात आणतांना त्यांचा कुटुंबियांचा अन् आप्तेष्टांना शोक अनावर झाला. शुक्रवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

na dho mahanor
कवितेचा मळा फुलवला
कविवर्य ना.धों. महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड येथे झाला. अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या पळसखेड या गावी त्यांनी कवितेचा मळा फुलवला. त्याचा सुंगध तमाम मराठीजणांपर्यंत गेला. अल्पवधीतच त्यांच्या साहित्याने मराठीजणांचे लक्ष वेधले. त्यांच्या ‘रानातल्या कविता’ अनेकांच्या ओठांवर येऊ लागल्या. साठोत्तरी काळातील साहित्यप्रेमी त्यांच्या कवितांच्या प्रेमात पडले. त्यामुळे अनेक चित्रपटात गीत म्हणून त्यांच्या कविता गाजल्या. अबोली, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, उरूस, मालक, अजिंठा, यशवंतराव चव्हाण, एक होता विदूषक या चित्रपटांत त्यांची गाणी आली.

na dho mahanor
जळगाव कर्मभूमी
ना.धों.महानोर यांचे जन्मगाव पळसखेडा. पिंपळगाव, शेंदुर्णी या ठिकाणी त्यांची शालेय शिक्षण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावला आला. जळगाव हीच त्यांची कर्मभूमी झाली. त्यांचे सर्वाधिक आयुष्य जळगावात राहिले. जळगावकरांशी त्यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले. साहित्यगप्पांसाठी त्यांचा जळगावात ग्रुपच तयार झाला होता.
