
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा उडत असताना दुसरीकडे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी एका जाहीर सभेत भगीरथ भालके यांच्याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भगीरथ भालके हे भाजपमध्ये येऊन उमेदवारी मिळवण्यासाठी कसे धडपडत होते, याचा खळबळजनक दावा परिचारक यांनी केला आहे.
पंढरपूर येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसाट यांच्या प्रचारसभेत बोलताना प्रशांत परिचारक यांनी याबद्दल भाष्य केले. भगीरथ भालके यांनी भाजपमधून उमेदवारी मिळावी म्हणून माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला. ते मला भेटण्यासाठी तब्बल चार तास वाट पाहत थांबले होते. मी त्यांना भेटलो नाही. तेव्हा मी त्यांना भाजपच्या नेत्यांना भेटा असा निरोप दिला. यानंतर भालके यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा माझ्याकडेच पाठवून दिले, असे परिचारक यांनी भर सभेत सांगितले.
पंढरपूर नगराध्यक्ष निवडणुकीमुळे प्रशांत परिचारक यांच्या गौप्यस्फोटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठीची प्रामुख्याने भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. भाजपकडून शामल शिरसाट या रिंगणात आहेत. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिती भालके या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भगीरथ भालके यांनी भाजपमधून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा परिचारक यांनी केला आहे. या चुरशीच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चेचा विषय बनला आहे आणि यामुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रणिती भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांचे पती भगीरथ भालके हे या भागातील एक प्रमुख राजकीय चेहरा आहेत. त्यामुळे त्यांच्या पतीच्या भाजप प्रवेशाच्या कथित प्रयत्नांवरून हा वाद रंगला आहे. प्रशांत परिचारक यांच्या या खळबळजनक भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे पंढरपूरच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.