महिलेचा गर्भपात अन् पेपरवर नवऱ्याचं नाव अनंत गर्जे; गौरी पालवेच्या आत्महत्येप्रकरणी दमानियांचा मोठा खुलासा

गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा खुलासा केला आहे. गौरीला घर शिफ्ट करताना काही पेपर्स सापडले आणि त्यात किरण इंगळे नावाची बाई होती. तिच्या गर्भपाताच्या कागदपत्रांवर नवऱ्याचं नाव अनंज गर्जे म्हणून होतं, असं त्यांनी सांगितलं.

महिलेचा गर्भपात अन् पेपरवर नवऱ्याचं नाव अनंत गर्जे; गौरी पालवेच्या आत्महत्येप्रकरणी दमानियांचा मोठा खुलासा
Anant Garje and Gauri Palve
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2025 | 1:13 PM

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे-गर्जेनं आत्महत्या केली आहे. यावर्षी फेब्रुवारीतच या दोघांचं लग्न झालं होतं. आता मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या गौरीनं टोकाचं पाऊल उचललं असून याप्रकरणी तिच्या आईवडिलांनी धक्कादायक आरोप केले आहेत. “ती साधी होती पण स्ट्राँग होती. आत्महत्या करेल अशी बिलकूल ती मुलगी नव्हती. काल संध्याकाळी जेव्हा आईवडिलांना गौरीच्या आत्महत्येबद्दल कळालं, तेव्हा ते बीडमध्ये एका लग्नात होते. तिथून ते पूर्ण रात्र प्रवास करून वरळी पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यांना पोटच्या मुलीला अशा अवस्थेत नायर हॉस्पीटलमध्ये बघावं लागलं. काय बोलावं मला कळत नाहीये. तिने आत्महत्या केली की तिचा घात केला, हे आम्हाला माहीत नाही, असं तिचे वडील पोलिसांसमोर म्हणाले. महाराष्ट्रात डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत. आधी वैष्णवी झाली, मग संपदा झाली.. संपदादेखील बीडची होती आणि आज ही गौरीदेखील बीडचीच आहे,” असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.

“किरण इंगळे नावाच्या महिलेचा गर्भपात, पेपरवर नवऱ्याचं नाव अनंत गर्जे”

यावेळी दमानिया यांनी अनंत गर्जेंबद्दल धक्कादायक खुलासा केला. “गौरी आधी बीडीडी चाळीत राहायची. तिथून त्यांना टॉवरमध्ये शिफ्ट करायचं होतं, तेव्हा पॅकिंगच्यावेळी तिला काही पेपर्स सापडले. त्यात किरण इंगळे नावाची बाई होती. तिचा गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, त्यावर तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं. हे पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले. त्यातून हे झालं,” असं तिच्या आईवडिलांनी सांगितल्याचं दमानिया म्हणाल्या.

गौरीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा

“गौरीची एक मैत्रीण तिला दीड वर्षापासून ओळखते. फेब्रुवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यात बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या. म्हणजे तिला नेहमी मारहाण होत होती. हे जेव्हा कळतं तेव्हा दु:खं होतं. काय बोलावं हेच सुचत नाही आणि काल ती ड्युटीवर होती. एक वाजेपर्यंत ड्युटीवर होती. त्यानंतर घरी गेली. नंतर साडेसहाला हे घडलं असेल तर त्या साडेपाच तासात काय झालं,” असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

पंकजा मुंडेंना विनंती

“गौरीच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की, जेव्हा गौरी ही अनंत गर्जेंची बहीण शीतल गर्जे-आंधळेंना सांगायची, तेव्हा ती म्हणायची की तुला नांदायचं असेल तर नांद, नाहीतर आम्ही त्याचं दुसरं लग्न लावू. त्यामुळे एफआयआर हा अनंत गर्जे, बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे या तिघांच्या विरोधात आहे. मला यात खरंतर राजकारण आणायचं नाहीये. पण पंकजा मुंडेंना रात्री कळलं असेलच. पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणणं अपेक्षित आहे. ते त्यांनी म्हणावं,” अशी विनंती दमानिया यांनी पंकजा मुंडेंना केली आहे.