परभणी हादरले! ‘नीट’ परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने १८ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:ला संपवलं

परभणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 18 वर्षांच्या मुलाने विष प्राशन करून आपला जीवन प्रवास संपवला आहे. अभ्यासाचा ताण आणि आपण या कठीण परीक्षेत यशस्वी होऊ की नाही या भीतीने त्याने टोकाचे पाऊल उचलले.

परभणी हादरले! नीट परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने १८ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:ला संपवलं
NEET paper
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 28, 2026 | 4:15 PM

वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ (NEET) परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक विद्यार्थाला ही परिक्षा दिल्यानंतर पास होणार की नाही अशी भीती असते. या सततच्या दडपणाखाली आणि भीतीने एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने विष प्राशन करून आपला जीवन प्रवास संपवल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथे हा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नांदेड येथे करत होता परीक्षेची तयारी

प्रथमेश राठोड असे आत्महत्या केलेल्या या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रथमेश हा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘नीट’ परीक्षेची जोरदार तयारी करत होता. यासाठी तो नांदेड येथे राहून खासगी क्लासेस करत होता. मात्र, जसजशी परीक्षा जवळ येत होती, तसतसा त्याच्यावरील ताण वाढत चालला होता.

चार दिवसांपूर्वीच आला होता गावी

अभ्यासाचा ताण आणि आपण या कठीण परीक्षेत यशस्वी होऊ की नाही, ही भीती त्याच्या मनात घर करून बसली होती. याच नैराश्यातून अवघ्या चार दिवसांपूर्वी तो नांदेडहून आपल्या गावी (गोदावरी तांडा) परतला होता. घरी आल्यानंतरही तो याच तणावाखाली वावरत होता. अखेर या नैराश्यापोटी त्याने विष प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला.

पोलीस ठाण्यात नोंद

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमेशच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सध्या या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या ताणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देण्याची नितांत गरज या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Follow Us