Phaltan Doctor death case : फलटण महिला डॉक्टर मृत्यूप्रकरण, अंबादास दानवे यांचा खळबळजनक दावा; अभिजीत निंबाळकरांचं नाव घेत गंभीर आरोप
Phaltan Doctor death : साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णलयात काम करणाऱ्या एका तरूण महिला डॉक्टरने आत्महत्या करत तिचं अनमोल जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी तिने सुसाईड नोट लिहीत दोघांवर आरोप केले होते. डॉक्टरचं हे मृत्यूप्रकरण आता चांगलंच तापलं असून आता शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

Phaltan Doctor death : साताऱ्यामधील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या(Satara Doctor Suicide) बातमीने अख्खा महाराष्ट्र हादरला. मृत्यूपूर्वी तिने हातावर सुसाईड नोट लिहीत पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचा तसेच घरमालक प्रशांत बनकर याने आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप तिने केला. या आत्महत्येमुळे मोठी खळबळ माजली असून राज्यात हे प्रकरण चांगलचं तापलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान त्या महिला डॉक्टरच्या मृतदेहावर काल तिच्या बीडमधील मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप
महिला डॉक्टरच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला असून यावरून आता राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात होता अशी माहिती समोर आली होती. एफआयर दाखल करण्यासाठी 4-5 तास लावले, राजकीय दबाव असण्याची शक्यता. पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, रिपोर्ट बदलायला सांगायचे, असे गंभीर आरोप मृत महिला डॉक्टरच्या भावाने केले आहेत. दरम्यान आता या प्रकरणातील अनेक घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे (Ambadas Danve) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी अनेक दावे केले आहेत. ‘ सर्व शासकीय कामात सत्ताधारी आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकर यांनी हस्तक्षेप केला’ असा दाव दानवे यांनी केला. ‘माजी खासदारांच्या पीएनेसुद्धा यात दबाव टाकला’ असाही आरोप दानवेंनी केला. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ, 10 तास आधी काय-काय घडलं?
काय म्हणाले अंबादास दानवे ?
याप्रकरणात मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव सर्व अधिकाऱ्यांवर आहे. इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोकं आहे, माजी खासदार आहेत, सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अभिजीत निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सर्व शासकीय कामात सातत्याने हस्तक्षेप करत आहे. मागच्या काळात महाडिक नावाचे पीआय इथ होते, या महाडिकांकडे या डॉक्टर महिलेने जुलै महिन्यात तक्रार केली होती. सगळ्या त्रासाविषयी कल्पना दिली असतानानाही महाडिकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तिचा अर्ज केराच्या टोपलीत टाकला. त्यांनी तेव्हाच त्या अर्जाची दखल घेतली असती तर आज त्या महिला डॉक्टरचा जीव वाचला असता, असं दानवे म्हणाले.
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 24, 2025
एवढंच नव्हे तर माजी खासदारांच्या पीएनेसुद्धा यामध्ये फोन केले, दबाव टाकला, असा आरोप दानवे यांनी केला. म्हणूनच हा (महिला डॉक्टरचा) जो जीव गेला आहे हा या व्यवस्थेने घेतलेला जीव आहे,असाही दावा त्यांनी केला. म्हणनूच या डॉक्टर महिलेला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अधिकारी या जिल्ह्यातले नसावेत, बाहेरच्या जिल्ह्यातले महिला अधिकारी आणू याप्रकरणाची चौकशी व्हावी. संंबंधितांना फासावर लटकवावं अशी मागणी दानवे यांनी केली आहे. दरम्यान दानवे यांच्या आरोपानंतर मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
