
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणावरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अडचणीत आले आहेत. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणला गेले होते, त्यावेळी त्यांनी निंबाळकर यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली होती. मात्र आता फडणवीस आणि निंबाळकर यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात ग्रँड टूरच्या उद्घाटनाला आले होते. याच ठिकाणी रणजितसिंह निंबाळकरही आले होते, मात्र यावेळी या दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही. हा रणजितसिंह निंबाळकर यांना मोठा झटका मानला जात आहे. कारण सुषमा अंधारे यांच्या आरोपांनंतर फडणवीस आणि निंबाळकर हे पहिल्यांदाच एकाच ठिकाणी आले होते, मात्र दोघांमध्ये बोलणं न झाल्याने फडणवीसांच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे बजाजच्या एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते, मात्र यावेळी त्या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हेही होते. यावेळी दोघांची भेट होणे अपेक्षित होते, मात्र दोघांमध्ये कोणतीही भेट झालेली नाही. याआधी फलटनमधील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी निंबाळकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे खंडन करत त्यांनी क्लीन चिट दिली होती, मात्र आता काही दिवसांनी फडणवीसांनी निंबाळकर यांच्याशी बोलणं टाळलं आहे. त्यामुळे फडणवीस हे निंबाळकर यांच्यावर नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत.
सुषमा अंधारे यांनी सातारा डॉक्टर प्रकरणात तपासाची कक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे. अंधारे यांनी, ‘माझ्या बोलण्याला काहीही आधार नाही, असे सांगितले जात आहे. पण सातारा डॉक्टर महिलेने काही पत्रं लिहिली होती. त्यांनी आरोग्य विभागाचे आपले वरिष्ठ डॉ. अंशुमन धुमाळ यांना पत्र लिहिले होते. खासदारांचे दोन पीए आहेत. एपीआय झायपात्रे, पीएसआय पाटील, अंशुमन धुमाळ, निंबाळकरांचे दोन पीए तसेच रणजितसिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणावे’ अशी मागणी केली होती.