मुंबईत काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेताच काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर..
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक झाली. जोरदार आंदोलन केले जात आहे. त्यातच रात्री उशिरा पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. ज्यानंतर मुंबईत काँग्रेस आक्रमक झाली.

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मुंबईत राजकारण तापले. मध्यरात्री वांद्रे रिक्लमेशन येथे युवक काँग्रेसचे आंदोलन केले.पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध आंदोलन करत असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आकाशवाणी भवनजवळ दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या घटनेचे पडसाद आर्थिक राजधानी मुंबईत उमटले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष जीनत सबरीनच्या नेतृत्वात मुंबईच्या वांद्रे रिक्लमेशन परिसरात मध्यरात्री जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच, मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला अधिकारी वांद्रे रिक्लमेशन उड्डाणपुलाखाली जमले. त्यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कृतींना असंवैधानिक आणि हुकूमशाही ठरवत घोषणाबाजी केली.
हातात फलक घेऊन आंदोलकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि आपला निषेध नोंदवला. अचानक झालेल्या रस्त्यावरील आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली. माहिती मिळताच मुंबई पोलिसांची एक मोठी तुकडी घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करून शांत होण्याचे आवाहन केले, परंतु कार्यकर्त्यांचा संताप काही कमी झाला नाही.
त्यानंतर, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी महिला कार्यकर्त्यांसह सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीची औपचारिक प्रक्रिया आणि आवश्यक कायदेशीर कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर रात्री उशिरा सर्व आंदोलकांना सोडण्यात आले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ कल्याणात युवक काँग्रेस आक्रमक.
कल्याण रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेल रोकोचा प्रयत्न. घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला असून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपला इशारा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि कथित मतचोरीच्या विरोधात दिल्लीत काँग्रेसकडून 9 तासांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. याचे पडसाद कल्याणमध्ये उमटले असून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.