
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं दोन दिवसांपूर्वी भीषण विमान अपघातात निधन झालं. बारामती एअरपोर्टजवळ अजितदादांच विमान लँडिंग करत असताना कोसळलं. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. अजितदादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाहीय. कारण असं काही होईल असा कोणी ध्यानीमनी सुद्धा विचार केला नव्हता. अजितदादांचं बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यावर काल बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विशाल जनसमुदायाने साश्रू नयनाने आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला.
अजित पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांना अंत्यसंस्काराच्यावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली. अजित पवार यांना सलामी म्हणून तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले. यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झालं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
तिथे कोण-कोण होतं?
अजितदादांना पोलिसांकडून अखेरची सलामी देण्यात येत असताना ही घटना घडली. पोलिसांकडून सलामी देताना तीन राऊंड हवेत फायर केले जातात. यावेळी समोरच्या रांगेतील पोलिसाकडून पहिला राऊंड फायर केल्यानंतर दुसरा राऊंड फायर करताना पोलिसाच्या बंदुकीतून मिसफायर झालं. सुदैवाने बंदुकीतून सुटलेली ही गोळी कोणाला लागली नाही. हे अत्यंत धोकादायक आहे. कारण अजित पवार यांच्या पार्थिवाला मुलांकडून मुखाग्नी दिली जात होता. यावेळी तिथे अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तिथे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, त्याशिवाय अन्य पक्षांचे नेते तिथे हजर होते. पण सुदैवाने कुठली अप्रिय घटना घडली नाही.