‘दरवाजा आतून लावून घ्या, मी येतो’ म्हणाले, काही तासात आले निधानचे वृत्त, एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस अधिकारी कालवश
विजय सागंडे नेहमीप्रमाणे सकाळी कुटुंबीयांशी बोलून ड्युटीला गेले. ठाण्यात ड्युटीदरम्यान त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. त्यांना जय आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी कर्तव्यावर जाताना त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला.

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे यांचे निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. कामावर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना छातीत दुखायला लागलं. त्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यांनतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सांगडे हे एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते या कर्तव्यावर होते. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जातेय.
दरवाजा आतून लावून घ्या, मी येतो
मिळालेल्या माहितीनुसार ते डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये आपल्या कुटुंबसोबत राहत होते. त्यांचं पार्थिव आता त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे. विजय सागंडे नेहमीप्रमाणे सकाळी कुटुंबीयांशी बोलून ड्युटीला गेले. ठाण्यात ड्युटीदरम्यान त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. त्यांना जय आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी कर्तव्यावर जाताना त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. “दरवाजा आतून लावून घ्या, मी येतो” असं म्हणत ते घरातून बाहेर पडले होते. त्यांचे हेच शब्द त्यांच्या कुटुंबीयांशी शेवटचा संदेश ठरला.
डोंबिवलीत व्यक्त केली जातेय हळहळ
डोंबिवलीतील मानपाडा मंदिराजवळील शिव मल्हार आर्केडमध्ये पत्नी, दोन मुलं, दोन सुना आणि नातवंडांसह ते राहत होते. मोठा मुलगा सागर महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये, तर लहान मुलगा शुभम पोलीस अकॅडमी चालवतो. निधनानंतर त्यांचे पार्थीव डोंबिवलीतील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्र आणि रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, त्यांच्या अचानक जाण्याने सागंडे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. एका प्रकारे कुटुंबातील प्रमुख सदस्यच नाहीसा झाला आहे. दरम्यान, सागंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या नोकरीवरील स्वभावाविषयी बोललं जातंय. कर्तव्यकठोर अशी त्यांची वृत्ती होती. घरीदेखील ते सर्वांशी हसत खेळत बोलायचे. शेजारच्यांसीही त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने डोंबिवली भागात हळहळ व्यक्त केली जात असून अशा कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो, अशी प्रार्थना केली जातेय.
