कुठे तुंबळ हाणामारी, तर कुठे पैशांचा पाऊस; मतदानाआधी महाराष्ट्र तापला, वरळी ते जळगाव कुठे काय घडतंय?
डोंबिवलीत पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार हाणामारी झाली असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच जळगावात मतदारांना पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीच्या धामधूम सुरु आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी ठिकठिकाणी राडे आणि पैशांच्या वाटपाचे आरोप होत आहेत. त्यातच आता डोंबिवली पूर्वेकडील तुकारामनगर परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. तर दुसरीकडे जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
डोंबिवलीच्या तुकारामनगर भागात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी असा आरोप केला आहे की, आम्ही गणपती दर्शनासाठी गेलो असताना शिवसेना उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात उमेदवारांसह दोन्ही गटांचे चार जण जखमी झाले आहेत.
शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणालाही मारले नाही. उलट भाजपचे लोक पैसे वाटताना पकडले गेले. पोलिसांना पहिला फोन आम्हीच केला. भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून आमदार रवींद्र चव्हाण हा राग काढत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एसीपी हेमंत हेमाडे यांनी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
वरळीत पैसे वाटपाचे गंभीर आरोप
तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या या बालेकिल्ल्यात आता पैसे वाटपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वरळीतील प्रभाग क्रमांक १९३ च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटल्याचा दावा शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांनी केला आहे. विशेष म्हणजे, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी, ज्यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आहे. त्यांनीच या कथित पैसे वाटपाचे व्हिडीओ समोर आणले आहेत. या व्हिडिओमध्ये हरिश वरळीकर महिलांच्या बैठकीत पैसे वाटप करताना दिसत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावेळी निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारामुळे वरळीत मोठी खळबळ उडाली आहे.
जळगावात पैसे वाटपाचा व्हिडीओ व्हायरल
जळगावच्या प्रभाग ११ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अपक्ष उमेदवारांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. याबद्दल कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणावर शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरिता माळी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रचार रॅलीमध्ये काम करणाऱ्या बचत गटाच्या महिलांना त्यांच्या कामाचे (रोजंदारीचे) पैसे दिले जात होते. त्याचा कोणीतरी चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ बनवला आहे. मतदारांना पैसे वाटण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
