
राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या इनकमिंगचा फटका हा महाविकास आघाडीला कमी आणि भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालाच जास्त बसला आहे. यावरून सध्या महायुतीमध्ये नाराजीचं वातावर आहे. शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्यात आला होता, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले, तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, सध्या शिंदे यांचा दिल्ली दौरा चांगलाच चर्चेत आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भाजपावर आता थेट टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
डाहाणू नगर परिषद निवडणुकीमधील शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माच्ची यांच्या प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘एवढे उमेदवार आणि एवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ज्या उमेदवारांनी आपले उमेदवार मागे घेतले त्यांचे अभिनंदन, या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा फडकणार आहे. लाडक्या बहिणी सत्ता उलटून टाकतात, डहाणूमध्ये जेवढा समुद्र मोठा आहे, तेवढी लोकांची मनं देखील मोठी आहेत. या सभेला जी गर्दी उसळली त्यावरून राजू माच्ची यांचा विजय निश्चित आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नावं न घेता पहिल्यांदाच जोरदार टीका केली आहे. एकाधिकार शाही आणि अहंकाराविरोधात आपण आता एकत्र आलो आहोत. असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावल्याची चर्चा आहे, तसेच राजू माच्ची यांच्या निषाणीवर शिक्का मारा आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहनही यावेळी शिंदे यांनी केलं.
मात्र आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या टीकेवर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अहंकार संपवण्यासाठी आपण एकत्र आलोय, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपावर केली नसून, उद्धव ठाकरे यांच्यावर केली असल्याचं म्हटलं आहे.