पुण्यात चाललंय तरी काय? महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना, गेल्या 90 दिवसात…

पुणे शहरात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत ५० बलात्कार आणि ६६ विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली आहे.

पुण्यात चाललंय तरी काय? महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना, गेल्या 90 दिवसात...
women assault
| Updated on: May 07, 2026 | 8:56 AM

विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. पुणे शहराची ओळख वेगाने बदलत आहे. सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीने सुरक्षित पुणे या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. २०२५ पासून आतापर्यंतच्या पोलीस दलाच्या आकडेवारीची माहिती समोर आली आहे. यामुळे पुण्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ते गंभीर वळणावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, महिलांवरील अत्याचाराचे स्वरूप चिंताजनक आहे. २०२५ मध्ये पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २१९ बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यात आले होते. मात्र, २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांतच जानेवारी ते मार्च या कालावधीत ही संख्या ५० वर पोहोचली आहे. याचाच अर्थ, २०२६ मध्ये दिवसाला सरासरी एका गुन्ह्याची नोंद होत आहे.

केवळ गंभीर अत्याचारच नव्हे, तर विनयभंगाच्या घटनांनीही पुणेकर महिला धास्तावल्या आहेत. २०२५ मध्ये विनयभंगाचे २९७ गुन्हे नोंदवण्यात आले होते. तर २०२६ च्या पहिल्या ९० दिवसांतच ६६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गजबजलेले रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि सोसायट्यांच्या परिसरातही महिलांना असुरक्षित वाटू लागले आहे.

वाढत्या गुन्हेगारीची प्रमुख कारणे

तज्ज्ञांच्या मते आणि पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यांमागे काही प्रमुख कारणांचा समावेश आहे.

१. ओळखीच्या व्यक्तींचा सहभाग: बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे, नातेवाईक किंवा मित्र असल्याचे समोर आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याच्या प्रकरणांचे प्रमाण मोठे आहे.

२. सोशल मीडियाचा गैरवापर: इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या माध्यमांतून मैत्री करून, त्यानंतर ब्लॅकमेलिंग किंवा फसवणूक करून अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे.

३. व्यसनाधीनता: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये वाढते अमली पदार्थांचे सेवन हे देखील विनयभंगाच्या वाढत्या घटनांचे एक कारण मानले जाते.

प्रशासनाकडून खबरदारीची पावले 

पुणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात करून गस्त वाढवली आहे. तसेच भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे. रात्रीच्या वेळी एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी कॉप विथ यू सारखे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, शहराचा वाढता विस्तार, आयटी हबची व्याप्ती आणि अपुरे पोलीस बळ यामुळे प्रत्येक कोपऱ्यात लक्ष ठेवणे कठीण होत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा कडक धाक निर्माण करणे हे आता सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान बनले आहे.

Follow Us