विषारी दारूकांडामुळे संताप… पुण्यात युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन; गुलाबी गँगही उतरली रस्त्यावर
पुणे आणि पिंपरी येथे विषारी दारूमुळे 15-16 लोकांचा जीव गेल्यानंतर राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. युवक काँग्रेस आणि गुलाबी गँगने रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. बेकायदेशीर दारू विक्री बंद करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिस आयुक्तांनी 13 अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, मुख्य दोषींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

विषारी दारू प्यायल्यामुळे पुणे आणि पिंपरी येथील 15-16 लोकांना जीव गमवावा लागला. पुण्यातील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने अख्खं राज्य हादरलं असून संतापाचं वातावरण आहे. हे प्रकरण आता चांगलचं तापलं असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुण्यात या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केलं. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालया बाहेर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं असून लोकांचा बळी गेल्याने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. कार्यकर्त्यांचा संताप दिसत असून बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतानाच, त्यांनाही गराडा घालत जाब विचारण्यात आला.
कार्यकर्ते आक्रमक
याप्रकरणातील आरोपी , गुन्हेगार योगेश वानखेडेला परत परत कोणी सोडलं? वानेखेडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याला कोणी सोडलं, असा सवाल विचारण्यात आला. तसेच पोलिस आयुक्तांनी 13 अधिकाऱ्यांना निलंबित केलं. पण महत्वाचा दोषी बाहेर असताना त्यांच्यावर अजून कारवाई का केली नाही, त्यांची नावं अजून का बाहेर आलेली नाहीत, असा सवाल आक्रमक कार्यकर्त्यांनी विचारला.
देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
भारतीय युवा मोर्चाचा जो अध्य्क्ष आहे महाराष्ट्राचा, कृष्णा महाजिक, तो स्वत: म्हणतोय की महाराष्ट्र हे ड्रग्गचं साम्राज्य झालं आहे. यावरून हे स्पष्ट होतं की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल फेल ठरले आहेत. त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, कार्यकर्त्यांच्या या घोषणांनी परिसर दुमदुमत होता.
गुलाबो गँगही रस्त्यावर, दारू माफियांवर कठोर कारवाईची मागणी
तर दुसरीकडे गुलाबो गँगही रस्त्यावर उतरली आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. पुण्यातील पर्वती पायथा परिसरात संगीता तिवारी यांच्या गुलाबो गँगकडून आंदोलन करण्यात आलं. काल विषारी दारूमुळे पुण्यात झालेल्या 15पेक्षा जास्त नागरिकांचा दुर्दैवी मृत्यूनंतर, बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या गुत्त्यांविरोधात गुलाबो गँगने “हल्लाबोल आंदोलन” केलं. यावेळी हातात फुगे आणि काठ्या घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच पुण्यातील सर्व बेकायदेशीर दारू गुत्ते तात्काळ बंद करावेत. विषारी दारू विक्रेत्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, मृतांच्या कुटुंबियांना न्याय व आर्थिक मदत द्यावी. महिलांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारू माफियांवर कठोर कारवाई करावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पुण्यात शिवसेनेने दारू चे ५ अड्डे केले उध्वस्त
दरम्यान पुण्यात शिवसेनेने दारूचे ५ अड्डे उध्वस्त केले. काल पुण्यात विषारी दारू ने १५ जणांचा मृत्यू झाला, तर आज पुण्यात नाना भानगिरे यांनी जवळपास ५ दारू चे अड्डे उध्वस्त केले आहेत. 5 अड्डे फोडले, गावठी दारू सापडली अनेक दुकान फोडली, अशी माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस नक्की काय करतात ? असा सवाल विचारण्यात येत आहे.