पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर, शेकडो तरुणांची फसवणूक

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून राज्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर, शेकडो तरुणांची फसवणूक
Sindhutai Sapkal
| Updated on: Jun 05, 2025 | 9:05 PM

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि सोलापूरसह राज्यातील विविध भागांतील शेकडो तरुणांची हजारो रुपये उकळून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही गंभीर बाब निदर्शनास येताच पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन कुंभारवळण संस्थेचे अध्यक्ष, दिपक दादा गायकवाड यांनी तातडीने तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना काही अज्ञात व्यक्तींकडून फोन केले जात होते. या फोनवर सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली उपलब्ध असल्याची खोटी माहिती दिली जात होती. त्यानंतर, ‘रजिस्ट्रेशन’ किंवा ‘नोंदणी शुल्क’ म्हणून 15 हजार रुपये फोन पे किंवा गुगल पे द्वारे ऑनलाइन मागवले जात होते. अनेक मुला-मुलींच्या पालकांची आणि नातेवाईकांची अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

या बनावट मॅट्रिमोनियल जाहिरातीची माहिती सर्वप्रथम ममता सिंधुताई सपकाळ यांना एका व्यक्तीकडून मिळाली. जेव्हा त्यांनी त्या नमूद केलेल्या क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा त्यांच्याकडे गेट पासच्या नावाखाली पैसे मागण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना काही मुलींचे फोटोही पाठवण्यात आले. ज्या मुलींचा आश्रमाशी कोणताही संबंध नव्हता. या प्रकारानंतर हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचे उघड झाले.

सखोल तपास सुरु

या प्रकरणी सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून सासवड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 319 (4), 318 (4), 356 (2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगितले की हा प्रकार एका मोठ्या रॅकेटशी जोडलेला असण्याची शक्यता आहे. राज्यभरात अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झाली असण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.