आम्ही घरात दिवाळी कशी करायची? 3 महिन्यांपासून पगार रखडला, जेवण वाढणाऱ्या हातांवरच सरकारचा अन्याय

पुणे जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार न मिळाल्याने दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे. या १.६५ लाख कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, वेळेवर मानधन आणि शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागण्या केल्या आहेत.

आम्ही घरात दिवाळी कशी करायची? 3 महिन्यांपासून पगार रखडला, जेवण वाढणाऱ्या हातांवरच सरकारचा अन्याय
| Updated on: Oct 14, 2025 | 11:17 AM

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण पुणे जिल्ह्यातील शालेय पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांचा पगार मिळालेला नाही. त्यांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि चालू ऑक्टोबर महिन्याचा पगार थकला आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला लवकरात लवकर पगार द्या, नाहीतर राज्यभर मोठे आंदोलन करू, असा इशारा शालेय पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

नुकतंच स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात भोर तालुका शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी, संघटनेचे सचिव विठ्ठल करंजे यांनी विविध मागण्यांबद्दल भाष्य केले. वाढीव एक हजार रुपयांसह ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन थकीत महिन्यांचे तसेच चालू ऑक्टोबर महिन्याचे मानधन दिवाळीपूर्वी त्वरित देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

शालेय पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या किती?

राज्यात जवळपास १ लाख ६५ हजार शालेय पोषण आहार बनवणारे कर्मचारी काम करतात. यातील भोर तालुक्यात ४७८ स्वयंपाकी आणि मदतनीस (मदतगार) काम करतात. त्यांना महिन्याला फक्त २५०० रुपये एवढा कमी पगार मिळतो. हे कर्मचारी फक्त जेवण बनवत नाहीत, तर त्यांना तांदूळ आणि धान्याची साफसफाई करणे, जेवण वाढणे, जेवणाच्या जागा, ताटे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे, सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे आणि पिण्याचे पाणी भरणे अशी बरीच कामे करावी लागतात. इतकी सर्व कामे करुन त्यांना फक्त २५०० रुपये पगार खूपच कमी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

संघटनेच्या मुख्य मागण्या काय?

  • सध्या मिळणारे २५०० रुपये मानधन वाढवून ते थेट २० हजार रुपये करावे.
  • त्यांना शासकीय सेवेत कायम करून घ्यावे.
  • दर महिन्याला वेळेवर आणि बाराही महिने पगार द्यावा.
  • वर्षातून दोन वेळा गणवेश (युनिफॉर्म) आणि ओळखपत्र (आयडी कार्ड) द्यावे.

संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार

मानधनाच्या तुटपुंज्या रकमेमुळे संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये मानधन वाढवून २० हजार रुपये करणे, कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करणे, वेळेवर आणि बारमाही मानधन देणे, तसेच ओळखपत्रासह वर्षातून दोन गणवेश पुरवणे यांचा समावेश आहे. शासनाने या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन दिवाळीपूर्वी मानधन न दिल्यास, संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.