
Pune Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपली आहे. या निवडणुकीमुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक पातळीवर जमेल त्या पक्षासोबत युती करून निवडणूक जिंकण्याची रणनीती राज्यातील प्रत्येकच पक्षाने आखली आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने काही ठिकाणी वाद पाहायला मिळाला. निष्ठावंतांना डावलल्यामुळे अनेक स्थानिक नेत्यांनी संताप व्यक्त केला. तर काही ठिकाणी वेळ संपल्यानंतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही ठिकाणी गोंंधळ उडाला. दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता अनपेक्षित आणि धक्कादायक असा ट्विस्ट आला आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आता मावळली आहे. तशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित न लढता स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवणार आहेत. याच निर्णयाचा एक भाग म्हणून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने 70 उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. त्यानंतर या 70 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या निर्णयाबाबत बोलताना अजित पवार यांच्या पक्षाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता आम्ही तुतारीच्या अस्तित्त्वासाठी लढणार आहोत, असे शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना थांबवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार होते. त्यासाठी जागावाटपावर चर्चा चालू होती. परंतु ऐनवेळी तोडगा न निघाल्याने आता युती मधील घटकपक्षदेखील स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेत चांगलीच चुरस रंगणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.