
पुण्यात पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर जागीच दोन जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे सख्ख्या चुलत भावांचा जीव गेला. या अपघाताचा व्हिडीओही पुढे आला असून हा अपघात किती जास्त भयंकर आहे, हे स्पष्ट दिसतंय. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. मेट्रो स्टेशनजवळ भरधाव वेगाने कारने खांबाला धडक दिली. अपघाताबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या अपघाताबद्दल बोलताना म्हटले की, पहाटे 4.55 हा अपघात घडला. मयत दोन्ही मुले पिंपरीची आहेत. जखमी विद्यार्थी एमआयटीच विद्यार्थी असून तो मूळ बीडचा आहे.
मोबाईल फोन मिळाले आहेत, तपास सुरू आहे CDR काढत आहोत. गाडीचा नंबर मिळाला आहे, तसा डिटेल्स तपास केल्या जात आहेत. अपघात झाला त्याठिकाणी बिअर बाटली मिळाली आहे, त्याचाही तपास सुरू आहे. मुलांनी अपघाताच्या अगोदर मद्यप्राशन केलं होतं का याचा देखील तपास सुरू आहे. काल रात्री आम्ही पार्टीला जाणार आहोत अस मयत मुलाने त्याच्या आईला सांगितलं होत त्याच अनुषंगाने तपास सुरू आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क अपघातात सख्ख्या दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मृत ऋतिक भंडारी आणि यश भंडारी हे गाडीत पुढच्या सीटवर बसले होते तर कुशवंत टेकवणी हा गंभीर जखमी झाला. गाडीचा हँड ब्रेक ओढल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिल्लरला जाऊन धडकली. गाडीचा वेग अधिक असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.
एम.एच. 24 डीटी 8292 गाडी काळ्या रंगाची गाडी असून गाडी भाड्याने घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पुणे पोलिसांकडून गाडी नेमकी कुठून आली याचा शोध घेतला जातोय. रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू केलं आहे. थोड्याच वेळात फॉरेन्सिक टीम अपघातस्थळी दाखल होणार आहे. अपघातातील गाडीत अल्कोहोल किंवा नशाली पदार्थ होते का याची तपासणी केली जात आहे.