
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारण्यात वनविभागाला मोठे यश मिळाले आहे. पिंपरखेड परिसरात दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेला आपला बळी बनवणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते. आता अखेर शार्प शूटरच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. त्यामुळे शिरूर, पिंपरखेड परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्याने काही दिवसांपूर्वी रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते. त्यांच्याकडून नरभक्षक बिबट्याला जागीच ठार मारण्याची मागणी केली होती. याप्रकरणी वनविभागाने या बिबट्याचा शोध घेण्यासाठी दिवसभर कॅमेरा ट्रॅप आणि ड्रोन सर्वे सुरू ठेवला होता. रात्रीच्या वेळी थर्मल ड्रोनच्या मदतीने तपास सुरू असताना, घटनास्थळापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट्याचे लोकेशन सापडले.
वन विभागाने त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट (Dart) मारण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या आणखी चवताळला आणि त्याने वन कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला सुरू केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून, तैनात असलेल्या शार्प शूटरने गोळीबार केला आणि बिबट्या जागीच ठार झाला. वन विभागाने ठार झालेल्या बिबट्याच्या पावलांचे ठसे नरभक्षक बिबट्याच्या ठशांसोबत जुळत असल्याचे समोर आले आहे. हा बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्षांचा नर बिबट्या होता.
आता मृत बिबट्याचे शव ग्रामस्थांना दाखवल्यानंतर, पुढील तपासणीसाठी ते माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. या यशस्वी संयुक्त कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील बिबटे पकडून त्यांना वनतारा येथे हलवले जाणार आहेत. राज्याच्या सचिवांनी केंद्राच्या वन विभागाच्या सचिवांशी संवाद साधून बिबटे हलवण्यासाठी मान्यता मिळवली आहे. पुणे जिल्ह्यात जवळपास २ हजार बिबटे असल्याचा अंदाज आहे. या बिबट्यांना रेस्क्यू करण्यासाठी ७०० पिंजरे मागवले गेले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.