
Pune Crime : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुंडांच्या 70 गँग असल्याचा बॉम्ब उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी टाकला. त्यांनी आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांनी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डान्सबार चालवणाऱ्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून का बसलेत? हेच कळत नसल्याचा टोला परब यांनी लगावला. त्यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा आरोप त्यांनी केला.
पुणे जिल्ह्यात गँगवार
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवार सुरू आहे. कोयता गँग आहे. पुणे जिल्ह्यात ७० गँग कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे करण्यासाठी जे लागत, म्हणजे सरकारचं पाठबळ आयतं मिळतं. हे सिद्ध झालं आहे. काही दिवसापासून निलेश घायवळ प्रकरण आपल्या माध्यमात चर्चा आहे. हा गुंड सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर गेला आहे. त्याचे गुंड थैमान घालत आहेत. रस्त्यावर उतरलेल्या माणसांवर गोळीबार करत आहेत. त्याच्या भावाला सचिन घायवळला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजुर केला आहे. शस्त्र परवाना घेण्याची पद्धत असते. अर्ज करावा लागतो. तो स्क्रूनिटीला जातो. स्थानिक पोलीस त्याची चौकशी करतात. तरीही तो पळून जातो, असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला.
कोर्टाशिवाय पर्याय राहणार नाही
योगेश कदम यांच्यावर कुणाचाही दबाव असेल, माझा साधा प्रश्न आहे. कुणाचाही दबाव असेल. मी मंत्री आहे. अर्धन्यायिक जज आहे. एखादी जजमेंट देताना मी विचार केला पाहिजे. पोलिसांचा रिपोर्ट आहे. तो गुंड आहे. गुंडाचा भाऊ आहे. समाजविरोधी कृत्यात तो आहे. म्हणून आम्ही परवाना नाकारत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी परवाना नाकारला तेव्हाही तो कोर्टाच्या गुन्ह्यातून दोषमुक्त होता ना. पोलिसांनी नाकारला त्याच ग्राऊंडवर कदम यांनीही परवाना नाकारायला हवा होता असे ते म्हणाले. तर योगेश कदम यांच्या सर्व गैरकृत्याबाबत कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ प्रतिमा जपत आहेत. पण त्यांचे मंत्री असे कृत्य करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोर्टाचे ताशेरे येण्यापूर्वची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. तर पुण्यातील गुन्हेगारीविरोधात आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा अनिल परब यांनी दिला.