Balaji Tambe passes away : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 4:01 PM

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe passes away) यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती.

Balaji Tambe passes away : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन
balaji tambe
Follow us

पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe passes away) यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वृत्त ‘सकाळ’ने दिलं आहे. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते.

बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. आरोग्य विषयक घडामोडींवर अत्यंत जागरुकपणे त्यांनी अनेक दशकं काम केलं. केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

संबंधित बातम्या  

पुणेकरांनी खासगी लसीकरण केंद्राकडे फिरवली पाठ

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI