Rohit Pawar: रोहित पवार यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये… एका शब्दाने वाद पेटला, अजितदादांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा बॉम्बगोळा
Sunil Shelke Criticized Rohit Pawar: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात बोलताना आमदार रोहित पवार यांच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टिप्पणीवर राजकीय वाद पेटला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील आमदाराने त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Sunil Shelke Criticized Rohit Pawar: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुण्याला कठोर पालकमंत्री देण्याची मागणी त्यांनी केली. तर सुनेत्री वहिनींना अजितदादांसारखे काम येत नाही असे मोठे विधान रोहित पवार यांनी केले. त्यावरून राजकीय वाद पेटला. त्यानंतर पवारांनी व्यक्तिगत माफीही मागितली. पण एका शब्दाने वाढलेला वाद वाढला. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीतूनही त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.
आमदार रोहित पवारांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखवण्याची वेळ
मावळचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिणींना दादांसारखे काम करता येत नाही या रोहीत पवार यांच्या विधानावर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक झाले. मुख्यमंत्री यांनी पुण्याचे पालकमंत्री पद घेतले तर पुण्याचे वाटोळे होईल, असे रोहित पवारांनी मत व्यक्त मांडले होते. दादांची जागा कुणी घेऊ शकत नाही पण जर कडक पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा काकींना ताकद द्या. रोहित पवार यांनी केलेल्या विधानांवर आमदार सुनील शेळके यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार केवळ प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. जर ते स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींवरच असे बोलत असतील, तर त्यांना आता एखाद्या ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये’ दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोला सुनील शेळके यांनी लगावला.
जरा जामखेडमध्ये जाऊन बघा
तसेच अजित दादांच्या अकाली जाण्यामुळे सुनेत्रा वहिनींवर अचानक ही जबाबदारी आली आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि स्वतःला कर्तबगार दाखवण्यासाठी स्वतःच्याच कुटुंबावर शिंतोडे उडवणे थांबवावे. त्यापेक्षा रोहित पवारांनी आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत, ते किती कर्तबगार आहेत हे तिथली जनताच बोलू लागली आहे. तसेच सुनेत्रा वहिनी एक महिला असूनही कठीण परिस्थितीत अत्यंत सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडत आहेत. त्या सकाळी ७ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. बारामती, पुणे जिल्हा, राज्य आणि पक्षाच्या जबाबदाऱ्यांसह सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थाही त्या उत्तमरीत्या सांभाळत असल्याचा आम्हाला अभिमान आणि समाधान आहे. महायुती सरकारमध्ये कोणाला कोणते पद द्यायचे, हे आमचे नेते ठरवतील. रोहित पवारांनी आमच्या पक्षात आणि महायुतीत नाक खुपसण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पक्षात किती किंमत उरली आहे आणि त्यांना कोणी विचारते का? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही शेळके यांनी लगावला.