वैष्णवीच्या मृत्यूनंतर अजित पवारांनी घेतली कस्पटे कुटुंबाची भेट, केली मोठी घोषणा
वैष्णवी हगवणे या तरुणीनं आत्महत्या केली आहे, सासरच्या छळाला कंटाळून तीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. आज अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली.

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, सासू आणि नणंद यांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मी पिंपरी चिंचवडचे सीपी चौबे म्हणून आहेत, त्यांना ताबडतोब सांगितलेलं होतं की, ही अतिशय चुकीची घटना आहे. यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचीही हयगय करायची नाही, कोणाचाही राजकीय हस्तक्षेप असला तरी जुमानायचं नाही. या घटनेमध्ये त्या मुलीला त्यांनी ज्या पद्धतीनं छळलेलं आहे, या घटनेशी संबंधित जे जे लोक असतील त्यांना ताबडतोब पकडं गेलं पाहिजे.
या घटनेत पोलिसांनी वैष्णवीच्या सासुला, नंदेला, वैष्णवीच्या पतीला आधीच पकडं होतं, मात्र तिचा सासरा आणि दीर सापडत नव्हते, त्या संदर्भात मी सतत सीपींच्या संपर्कात होतो. माझ्या काही कार्यकर्त्यांनी अनिलराव कस्पटे यांच्या घरी येऊन त्यांच्याशी माझं संभाषण करून दिलं, त्यावेळी मी बाहेर गावी होतो. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी संध्याकाळी कोल्हापूरहून येणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला भेटायला येतो. ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या गोष्टी मला मनमोकळेपणाने सांगा. येताना मी सीपींना पण सांगतो तिथे यायाला. या प्रकरणात आणखी एक व्यक्ती समोर आली आहे, चव्हाण असं या व्यक्तीचं नाव आहे, ज्या व्यक्तीने वैष्णवीच्या बाळाला आणताना काही चुकीच्या गोष्टी केल्या, असं अजित पवार यावेळी म्हटले.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला पकडल्यानंतर पोलीस तिचा सासरा आणि दीराच्या मागावर होते. ते सतत फोन बदलत होते, त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचण येत होती, मात्र पोलिसांनी सापळा रचला आणि त्यांना अटक केली. हे प्रकरण आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहोत. या प्रकरणात चांगला सरकारी वकील देणार आहोत. या संदर्भात माझं वैष्णवीच्या वडिलांशी देखील बोलणं झालं आहे, त्यांनी देखील एक -दोन नावं सांगितले आहेत, त्यावर विचार सुरू आहे, आरोपींना कडक शिक्षा दिल्या जाईल, या संदर्भात माझं मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणं सुरू आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.