कट्टर राजकीय विरोधक एकत्र, अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यात काय चर्चा?

| Updated on: Feb 06, 2022 | 6:21 PM

भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकत्र आले होते, पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याच्या मुलाच्या लग्नसमारंभात हे दोन्ही नेते एकत्र आले होते.

कट्टर राजकीय विरोधक एकत्र, अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यात काय चर्चा?
अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यात काय चर्चा?
Follow us on

पुणे : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकत्र आले होते, पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नसमारंभात हे दोन्ही नेते एकत्र आले होते. या लग्नसमारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप प्रदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राजकारणातील विळ्या भोपळ्याचे वैर असणारे व पक्के शेजारी, पक्के वैरी म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर परिचयाचे असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र एकाच कार्यक्रमात आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्यात जवळपास वीस ते बावीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही नेत्यांमधे काय चर्चा?

राष्ट्रवादीचे अजित पवार व एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीच्या सरकारमध्ये 15 वर्षे एकत्र काम केले. मात्र, दोघांच्यात राजकीय वैर होते. हर्षवर्धन पाटील यांचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा अजित पवार यांचा नेहमीच प्रयत्न असे. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाला अजित पवार यांनीच खऱ्या अर्थाने सुरुंग लावला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विरोध असतानाही दत्तात्रय भरणे यांना 2009 साली बंडखोरी करण्यास भाग पाडले. या नंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दोन वेळा विधानसभेला विजयी करण्यामध्ये अजित पवारांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, एकेकाळी आघाडी सरकार मध्ये काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते म्हणून असलेले हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा घरचा रस्ता दाखविण्यात अजित पवार यशस्वी ठरले आहे, हर्षवर्धन पाटील यांनीदेखील मी थेट अजित पवारांचा विरोधक असल्याचा जाहीर कार्यक्रमांमधून अनेक वेळा सांगितलेल आहे.

अनेक वर्षांचं राजकीय वैर

गेल्या अनेक विधानसभेसह अन्य निवडणुकांमधील विरोध, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील संघर्ष असं बरंच काही इंदापूर तालुक्यात घडलं आहे, पंधरा वर्षाच्या आघाडी सरकारमध्ये या दोघांचे पक्ष एकत्र असले तरी या दोघांचे इंदापूर तालुक्यातील शह-कटशहाचं राजकरण कधीही थांबलेल नसल्याचे इंदापूर तालुक्याच्या जनतेनं पाहिलं आहे. एवढा प्रचंड विरोध असल्यामुळे हे दोन्ही नेते खाजगी व सरकारी कार्यक्रमात एकत्र येण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र होते, परंतु नुकतेच हर्षवर्धन पाटील यांची कन्या व जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या लग्न सोहळ्यात अजित पवारांनी हजेरी लावली होती, त्यानंतर आता पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नसमारंभात हे दोघे एकत्र येत तब्बल वीस ते बावीस मिनिटं यांच्यात चर्चा झाल्याने अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावलेल्या आहे.

दोघांची जवळीक भरणेंना बोचणारी

आज देखील अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील बँकेच्या कामानिमित्त एकत्र येणारे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील एका बँकेच्या मीटिंग च्या निमित्ताने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे बारा वाजता एकत्र येऊन एका विषयावर ती चर्चा करणार असल्याचे अधिकृत माहिती आहे, मात्र गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अजित पवार यांना तातडीने मुंबईला जावे लागल्याने या दोघांमधील होणारी मीटिंग रद्द झाली आहे. त्यांची जवळीक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ही गोष्ट बोचणारी नक्कीच ठरत आहे.

सरकारचा डोंबिवलीकरांसाठी खास निर्णय, ‘त्या’ निर्णयाचे मनसे आमदाराकडून स्वागत

Nagpur Congress | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात, काँग्रेस कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करत नाही

वंचित बहुजन आघाडीही ठाणे पालिकेच्या रणांगणात, सर्वाधिक जागांवर महिलांना संधी देणार