Girish Kuber: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे.

Girish Kuber: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 6:45 PM

पुणे: ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत? असा सवाल या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. कुबेर कसं लिहितात त्यापेक्षा ते खूप मोठे लेखक विचारवंत आहेत. पहिली प्रतिक्रिया कृतीवर आहे. लोकशाहीमध्ये अनेक मार्ग आपल्या मनातला राग व्यक्त करण्यासाठी असताना शाई फेकून निषेध व्यक्त करणं हे न समजण्यासारखे आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लोकांच्या टोकाच्या श्रद्धा आहेत. त्या दुखावण्याचा अधिकार कुणाला दिला नाही. त्यामुळे पद्धती चुकीची असली तरी हे आता फारच चाललं आहे. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आपण किती करणार आहोत याचा विचार केला पाहिजे, असं पाटील म्हणाले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे चुकीचे

या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देऊन या घटनेचा निषेध नोंदवला होता. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्रं असतं. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसर कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरेकरांकडून अप्रत्यक्षपणे समर्थन

तर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या घटनेचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिलं असेल. छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपाहार्य लिहिलं गेलं असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी लिहित असेल बोलत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.

 

संबंधित बातम्या:

Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार

साहित्य संमेलनाला आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, साहित्य नगरीत खळबळ; दोघांना माघारी पाठवले

पक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार?